कुख्यात बाल्या गावंडे खुनातील सर्व नऊ आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:47 PM2017-12-12T23:47:42+5:302017-12-12T23:48:20+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
योगेश श्यामराव कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत श्रीराम बोकडे, शुभम जनकलाल धनोरे, गंगाबाई ऊर्फ पिंकी योगेश कुंभारे, जयभारत जयहिंद काळे , महेश रमेश रसाळ , नवीन चंद्रशेखर ताजनेकर आणि कुख्यात संतोष आंबेकरचा नातेवाईक नीतेश पुरुषोत्तम माने, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात संतोष आंबेकर हाही आरोपी आहे. तो फरार आहे. तो अटक होताच त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालणार आहे. रवींद्र ऊर्फ बाल्या गोविंद गावंडे (४०) रा. संघ बिल्डिंगमागे, असे मृताचे नाव होते.
२२ आणि २३ जानेवारी २०१७ च्या रात्री कळमना गावातील शिवशक्ती बारमागे बाल्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. मृताची पत्नी जयश्री रवींद्र गावंडे हिच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बाल्याच्या खुनाची हकीकत अशी, बाल्या हा आरोपी योगेश सावजीचा मित्र होता. योगेशने बाल्याला आपल्या संत तुकारामनगर येथील घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्यामुळे बाल्या हा आपली पत्नी जयश्री, मुलगी, मित्र प्रशांत पांडे आणि त्याच्या मुलीला घेऊन जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर जयश्री ही मुलीला घेऊन आपल्या घरी परत गेली होती. त्यानंतर योगेश सावजी आणि त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला करून बाल्याचा निर्घृण खून केला होता.
२०१३ मध्ये बडकस चौक महाल येथील जगदीश घायडे यांचा ११०० चौरस फुटाचा वादग्रस्त भूखंड जय काळे, नवीन ताजनेकर आणि महेश रसाळ यांनी संतोष आंबेकर याच्या म्हणण्यावरून विकत घेतला होता. हा भूखंड त्यांनी महाल येथील इंद्रायणी साडी सेंटरचा मालक वैभव खोबरागडे याला ८० लाख रुपयात विकला होता. बाल्या हा या सौद्यातील २० लाख रुपये मागून वारंवार काळेला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे कट रचून बाल्याचा खून करण्यात आला होता. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. आर. के. तिवारी, अॅड. पारिजात पांडे तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले.