अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 05:49 PM2022-10-17T17:49:04+5:302022-10-17T17:50:02+5:30

पोलिसांनी पारसेला बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही पीडित नागरिक समोर येत आहेत.

All persons whom associated with Ajit Parse on police 'radar'; Cyber ​​cell is conducting 'search operation' of mobiles, laptops, computers | अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

Next

नागपूर : सोशल मीडिया व सायबर तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण करणारा आरोपी अजित पारसे (वय ४२, भेंडे ले आऊट) याने अनेक नागरिकांना त्यांचे काम करून देण्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. परंतु, त्याने जमा केलेली रक्कम कोठे गुंतविली याचा गुन्हे शाखा कसोशीने शोध घेत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसेच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. पारसेशी निगडित व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर आहेत. अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्यानंतर पारसेने ही रक्कम मोठ्या प्रॉपर्टीत गुंतविल्याची पोलिसांना शंका आहे. परंतु, गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडल्यानंतर पारसे आपल्या निकटवर्तीयांच्या साह्याने संपत्तीचा निपटारा करू शकतो. पारसेचे चार-पाच वर्षांपूर्वीची प्रकरणेच पोलिसांच्या हाती लागली आहेत. पोलिसांनी पारसेला बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही पीडित नागरिक समोर येत आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी पीडितांना बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अजित पारसेला रुग्णालयातून सुटी मिळाल्याची माहिती आहे. घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तपास पथकाने गुरुवारी १३ ऑक्टोबरला अजित पारसेच्या घराची झडती घेऊन त्याचे सात मोबाईल, ३ लॅपटॉप, संगणक आणि ४ हार्डडिस्क जप्त केल्या आहेत. या उपकरणांची सायबर सेलने तपासणी सुरू केली आहे. अनेक तक्रारकर्ते तपास पथकाला भेटत आहेत. पोलीस त्यांना लेखी तक्रार करण्याचे आवाहन करीत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी

- डॉ. राजेश मुरकुटे आणि त्यांच्या नातेवाइकांची चार कोटी रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

- अजित पारसेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. सोबतच त्याची महागडी दुचाकीसह नऊ गाड्या जप्त करण्यात आल्या.

- रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर पोलीस घरी धडकल्याचे पाहून पारसेने आपल्या हातावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्याला रोखले.

- पारसेच्या सहा बँक खात्यांचे पासबुक पोलिसांच्या हाती लागले. त्याचे लॉकरही सील करण्यात आले असून, लवकरच लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे.

- पारसेविरुद्ध तक्रार करण्यासाठी १५ पेक्षा अधिक डॉक्टर आणि व्यावसायिक पोलिसांना भेटले असून, पोलीस त्यांच्या लेखी तक्रारीची वाट पाहत आहेत.

अनेक महिलांशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग

- अजित पारसेने अनेक संपन्न महिलांशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस या महिलांना न घाबरता नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत.

Web Title: All persons whom associated with Ajit Parse on police 'radar'; Cyber ​​cell is conducting 'search operation' of mobiles, laptops, computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.