सर्व राजकीय पक्षांनी बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध बांधवांच्या पाठीशी उभे रहावे; RSSची भूमिका
By योगेश पांडे | Published: August 9, 2024 07:29 PM2024-08-09T19:29:02+5:302024-08-09T19:32:17+5:30
हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांगलादेशमधील अस्थिर राजकीय स्थिती व अराजकतेच्या वातावरणात हिंदू, बौद्ध व अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशातील सर्व राजकीय पक्षांना एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेथील हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.
बांगलादेशात सत्ता परिवर्तानाच्या आंदोलनादरम्यान परिस्थितीत हाताबाहेर गेली व हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांक समाजासोबत हिंसा सुरू झाली. ही गंभीर बाब आहे. तेथील लोकांचे हत्याकांड, आग, लुटपाट, महिलांवरील अत्याचार, मंदिर व इतर प्रार्थनास्थळांवरील हल्ले सहन करण्याजोगे नाहीत. बांगलादेशमधील नवनियुक्त सरकार अशा घटनांवर नियंत्रण आणेल व तेथील अल्पसंख्यांकांच्या प्राण व मालमत्तेचे रक्षण करेल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीत जगातील विविध समुदाय व भारतातील राजकीय पक्षांनी एकत्रित येत पिडित लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. बांगलादेश आपला शेजारी देश आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेदेखील तेथील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले पाहिजे, असे होसबळे म्हणाले.