बाबासाहेबांचे ‘व्हीजन’ सर्वांगीण विकासाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:28 AM2017-09-18T01:28:23+5:302017-09-18T01:28:38+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे.

The all-round development of Babasaheb's 'Vhijen' | बाबासाहेबांचे ‘व्हीजन’ सर्वांगीण विकासाचे

बाबासाहेबांचे ‘व्हीजन’ सर्वांगीण विकासाचे

Next
ठळक मुद्देनितीन गडकरी : डॉ. आंबेडकर : ‘द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया’ गौरव ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे. परंतु त्यांनी मांडलेल्या त्या व्हीजनवर अंमलबवाणी करण्यात आपण अपुरे पडलो, असे प्रतिपादन केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया या गौरव ग्रंथाचे लोकार्पण रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामागील प्रांगणात नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, योजना आयोगाचे माजी सदस्य व गौरव ग्रंथाचे अतिथी संपादक डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचनापासून तर शेतीपर्यंत आणि उद्योगापासून तर नदीजोडणीपर्यंत अनेक विषयावर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या विचारांवर त्या काळात गांभीर्याने लक्ष दिले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते. त्यांनी नदी वाहतुकीबाबतही सांगितले होते. त्यांच्या विचारानुसार चाललो असतो तर एकट्या नदी वाहतुकीद्वारेच देशाचा विकास दर साडेतीन टक्केपर्यंत वाढला असता. नदी जोड प्रकल्पाबाबतही त्यांनी सांगितले आहे. मी या दोन्ही खात्याचा मंत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारानुसार आपले काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात देशात जलवाहतूक मोठ्या प्रमााणावर सुरू झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे यांनी ग्रंथावर भाष्य केले. प्रास्ताविक कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.
या देशाला बाबासाहेब समजलेच नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्मले हे या देशाचे सुदैव आहे. पण या देशाला बाबासाहेब समजले नाही, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे, असे स्पष्ट मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. या देशाने बाबासाहेबांची नेहमीच अवहेलना केली. त्यांना अपमानाशिवाय काहीच दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीरपणे मोठे गोडवे गायले जातात. पण आजही या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आत्मसात करता आले का किंवा आत्मसात करण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून प्रशासनिक दृष्टीने धोरण राबवणारी एक धाडसी व्यक्ती आहे. त्याबद्दल आपल्याला त्यांचा आदर आहे, असे गौरवोद्गारही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी काढले.
दोन तास उशीर, श्रोत्यांनी व्यक्त केली नाराजी
गौरव ग्रंथ लोकार्पण कार्यक्रमाची वेळ ही ६.३० वाजताची होती. कार्यक्रमासाठी नागपुरातील आंबेडकरी समाजातील लोक व श्रोते मोठ्या संख्येने आले होते. अनेक जण ग्रंथ विकत घेण्यासाठी ५ वाजेपासून आले होते. नितीन गडकरी हे त्याच वेळी एका दुसºया कार्यक्रमात होते. त्यामुळे त्यांना उशीर होणार हे साहजिकच होते. परंतु त्यांनी कार्यक्रम सुरू करा मला यायला उशीर असल्याचे आयोजकांना आधीच कळविले होते. ८ वाजले तरी कार्यक्रम सुरू झाला नसल्याने श्रोते संतापले. अनेक श्रोत्यांनी आयोजकांकडे आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आणि निघून गेले. अखेर पुढच्या कार्यक्रमातून गडकरी निघाले असा मॅसेज आला तेव्हा कुठे ८.२० मिनिटांनी कार्यक्रम सुरू करण्यात आला. श्रोत्यांची आयोजकांबद्दलची नाराजी मात्र कायम होती.

Web Title: The all-round development of Babasaheb's 'Vhijen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.