..तरच होणार विदर्भाचा सर्वांगीण विकास - प्रदीप माहेश्वरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:56 PM2023-03-06T14:56:52+5:302023-03-06T14:58:32+5:30
नैसर्गिक संसाधनांचे विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी : राजकीय नेत्यांच्या घोषणांची व्हावी अंमलबजावणी
नागपूर : विदर्भात खनिज संसाधने विपुल आहेत. त्यांच्या भरवशावर विदर्भाचा विकास शक्य आहे. राजकीय नेते विदर्भ विकासाच्या घोषणा करतात; पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ती झाल्यास विदर्भाचा सर्वांगीण विकास प्रचंड वेगाने होऊन मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास नैसर्गिक संशाधनांचे विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी येथे व्यक्त केला.
जन मंचतर्फे सीताबर्डी येथील मोर भवन हिंदी भवनातील सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ‘विदर्भ - अनंत संभावनोंका उजडा प्रदेश’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जन मंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, सल्लागार, अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठलराव जावळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
माहेश्वरी म्हणाले, विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनेक लोक वेगवेगळे विचार व्यक्त करतात. बहुतांश विचार अपुऱ्या माहितीवर आधारित आणि अर्धसत्य असतात. त्यात खरं काय, हा एक सवालच आहे. विदर्भाच्या दुर्दशेसाठी राजकीय अनास्था जबाबदार आहे का, सशक्त विदर्भ संपूर्ण देशाला समृद्धी देऊ शकेल काय, पंतप्रधानांच्या गती शक्ती योजनेला गती देण्यासाठी विदर्भात एवढी क्षमता आहे का, विदर्भात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची अद्भुत क्षमता आहे का, आदींसह अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
विदर्भात कोळशा आणि सिमेंटचे उत्पादन वाढल्याचे आपण अनेकदा ऐकतो. हे सर्व विकासाचे द्योतक आहे. पण, याकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्षच असते. समृद्धी महामार्गामुळे नवे उद्योग येतील असे म्हटले जात होते. पण, चार महिन्यांनंतरही असे काहीच घडले नाही. बुटीबोरी असो वा मिहान या मोठ्या औद्योगिक परिसरात उल्लेख करता येतील, असे मोठे उद्योग आले नाहीत. आकडेवारी सादर करताना त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी राजकीय दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला.