सीताबर्डीतील खुनाच्या तीनही आरोपींना अटक, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश
By दयानंद पाईकराव | Published: April 8, 2023 04:26 PM2023-04-08T16:26:15+5:302023-04-08T16:27:46+5:30
क्षुल्लक कारणावरून केला होता खून
नागपूर : ‘हमारे एरीया मे क्यु रुके हो’ असे म्हणून मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करणाऱ्या तीन आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली असून यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.
अनिश उर्फ डिंपी संजय हिरणवार (२१, गवळीपुरा, धरमपेठ) आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ मार्चला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ईश्वर रामचंद्र बोरकर (२३, दोपटाळा कॉलनी, राजुरा, चंद्रपूर) हा युवक आपले मित्र भोला परचाके, रोशन साकीनाला, आकाश वाघमारे यांच्यासोबत गप्पा मारत भोले पेट्रोल पंपाजवळील जलप्रदाय विभागाच्या कार्यालयासमोर उभे होते. तेवढ्यात स्कुटीवर तीन आरोपी तेथे आले. त्यांनी ‘यहा क्यु रुके हो’ असे म्हटले. त्यांच्यात वाद होऊन आरोपींनी ईश्वर बोरकर याच्यावर चाकुने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. ईश्वरच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान ५ एप्रिलला सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला होता. दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीवरून व तांत्रीक मदतीने पोलिसांना आरोपी केळवद टोलनाका परिसर सावनेर येथे असल्याचे समजले. सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि डीबी पथक रवाना करण्यात आले. पथकाने सापळा रचून आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. किरकोळ वादातून खून केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे.