विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि वन पर्यटन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:19+5:302021-04-15T04:07:19+5:30
नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह विदर्भातील सर्वच वन पर्यटन आणि व्याघ्र प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. ...
नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह विदर्भातील सर्वच वन पर्यटन आणि व्याघ्र प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या ब्रेक द चेनअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा अधिक ओघ असतो. त्यानंतर विदर्भात पेंच व अन्य प्रकल्पाला पर्यटकांची पसंती असते. मात्र मागील वर्षभरात कोरोना संसर्गामुळे वन पर्यटनावर बराच परिणाम झाला. यावर अवलंबून असलेल्या उद्योगांवरही विपरीत परिणाम झाला. दिवाळीच्या तोंडावर व्याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाला परवानगी मिळाली असली तरी जेमतेम सहा महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा व्याघ्र प्रकल्पांची दारे बंद झाली आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वीच्या निर्णयानुसार, आठवडाभरापूर्वी वन पर्यटनावर काही निर्बंध लावण्यात आले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत दर शनिवार आणि रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील वन पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. तर टिपेश्वर अभयारण्य आठवडाभरापूर्वीच बंद करण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य १५ एप्रिलपासून ३० एप्रिल किंवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.