विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 12:22 PM2021-12-28T12:22:35+5:302021-12-28T12:48:57+5:30

विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

all travelers come from abroad must undergo covid-19 test | विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे निर्देश ओमायक्रॉन सुरक्षेसंदर्भात आढावा

नागपूर : देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता, महापालिकेने ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

ओमायक्रॉन सुरक्षेसंदर्भात मनपातर्फे करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा आयुक्तांनी सोमवारी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी केली जात आहे. सध्या नागपुरात एअर अरेबिया हे विमान येत आहे. या विमानातून आलेले प्रवासी कोरोनाबाधित निघाले आहेत. त्यामुळे आता सर्व विदेशी प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

ज्या प्रवाशांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली. प्रवाशांच्या विलगीकरणाची व्यवस्था सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास येथे करण्यात आली आहे. तसेच ज्यांना हॉटेलमध्ये राहायचे असेल त्यांना हॉटेलमध्ये स्वखर्चाने विलगीकरणात राहता येईल. कोरोनाची संभाव्य तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता, डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य स्टाफ सज्ज ठेवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.

आजपासून नागपुरात निर्बंध

- कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने नोटीस जारी केली होती. त्यानुसार आज मंगळवार, २८ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. 

- जिल्हा आणि मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी निर्बंधांचे आदेश जारी केले होते. त्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. तसेच अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ वाजता बंद होतील, असे स्पष्ट केले होते.

- यासोबतच, विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात कार्यक्रम, लग्नसोहळा, अंत्ययात्रा आदींमध्ये लोकांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले होते.

- त्यानंतर, प्रशासनातर्फे सुधआरित आदेश काढून वेळेच्या बंधनासंबंधीचा कालावधी हटविण्यात आला होता.

- त्यामुळे, उद्यापासून विविध निर्बंधांचे आदेश लागू होणार असले तर दुकाने व इतर कार्यक्रम ९ वाजता बंद करण्याची जी वेळ होती, त्यांचीही वेळ वाढवली जाईल की नाही, हे उद्याच प्रशासनातर्फे स्पष्ट केले जाईल, अशी माहिती आहे.

पुन्हा कंटेनमेंट झोनची तयारी

- सद्यस्थितीत नागपुरात कोरोनाचे ९१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढली तर कंटेनमेंट झोन तयार करण्याचे संकेतही यावेळी आयुक्तांनी दिले. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले.

मृतकांच्या नातेवाइकांना मदत

मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानासाठी नागपूर शहरातील ३७०० प्रकरणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आलेली आहेत. आतापर्यंत १७०० प्रकरणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणव्दारे मंजूर करण्यात आली आहे.

१५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करा

३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. या वयोगटात इयत्ता दहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी येतात. नागपूर शहरात या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १ लाख आहे. या वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात यावे. तसेच यासाठी कोचिंग क्लासच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

चाचणीसाठी प्रवाशांनी पुढे यावे

विदेशी प्रवाशांनी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी पुढे यावे. जे प्रवासी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी पुढे येणार नाहीत, त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक नियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. ज्यांचे एस जीन रिपोर्ट फेल झाले आहे अशा (ओमयक्रॉन संशयित) रुग्णांना रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.

- राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त

Web Title: all travelers come from abroad must undergo covid-19 test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.