सांबारवडी महागच; सर्वच भाज्या ५० रुपयांवर, पावसामुळे भाज्या शेतातच खराब
By मोरेश्वर मानापुरे | Published: December 27, 2023 07:57 PM2023-12-27T19:57:03+5:302023-12-27T19:57:50+5:30
नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत.
नागपूर : हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्या स्वस्त असतात. या दिवसात वैदर्भीय सांबारवडीचा पाहुणचार सर्वच घरी असतो. पण यंदा कोथिंबीरचे भाव १२० रुपयांवर पोहोचल्याने अनेकांनी सांबारवडीचा बेत रद्द केला आहे. सर्वच भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी असून भाज्यांचा दर्जाही निकृष्ट आहे. परिणामी गृहिणींना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील. सध्या स्थानिक उत्पादक शेतकरी आणि अन्य जिल्ह्यातून भाज्या विक्रीला येत आहे. हिवाळ्यात १५० हून अधिक गाड्यांची होणारी आवक ६० ते ७० गाड्यांपर्यंत कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.
दरवर्षी हिवाळ्यात रस्त्यावर फेकाव्या लागतात पालेभाज्या
हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. दरवर्षी ५ ते १० रुपये किलो मिळणारे वांगे, पालक, मेथी आणि फूल कोबीचे दर यंदा ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. वाहतूक खर्च आणि अडतियांची दलाली परवडत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी दरवर्षी रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करतात आणि उरलेला माल जागेवरच सोडून गावाकडे परतात. पण यंदा अशी परिस्थिती नाही. सर्वच माल बाजारपेठांमध्ये विकला जात आहे.
स्थानिकांसह नांदेड, नाशिकहून आवक
स्थानिकांसह नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. टोमॅटो आणि पत्ता कोबी वगळता सर्वच भाज्यांचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर गेल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट वाढले आहे.
कांदे वाढले; बटाटे आटोक्यात
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. कळमना बाजारात लाल कांद्याची आवक औरंगाबाद, नगर आणि सोलापूर येथून असून पांढरे कांदे गुजरातेतून येत आहेत. सध्या २० ते २५ ट्रकची आवक आहे. कळमन्यात दर्जानुसार २५ रुपये किलोपर्यंत भाव आहेत, तर किरकोळमध्ये ४० ते ४५ रुपये दराने विक्री होत आहे. बटाट्याचे १० ते १५ ट्रक आग्रा आणि कानपूर येथून येत आहेत. किरकोळमध्ये प्रति किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. शिवाय यंदा लसणाचे भाव आकाशाला भिडले आहेत. कळमन्यात दर्जानुसार २५० ते ३०० रुपये तर किरकोळमध्ये भाव ४०० रुपयांवर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशातून दररोज दोन ट्रक विक्रीस येत आहेत.
ठोक आणि किरकोळमध्ये भाज्यांचे भाव (रुपये, प्रति किलो) :
भाज्या ठोक किरकोळ
वांगे ५० ७०-८०
हिरवी मिरची २५-३० ४०-५०
टोमॅटो १२-१५ २५-३०
कोथिंबीर ७०-८० ११०-१२०
फूल कोबी ३०-४० ५०-६०
पत्ता कोबी १२-१५ २०-२५
सिमला मिरची ५० ७०-८०
कारले ५० ७०-८०
हिरवा मटर २५-३० ४०-५०
भेंडी ६० ८०-९०
चवळी शेंग ७० ९०-१००
ढेमस ६० ८०-९०
कोहळे २० ३०-४०
लवकी १५ २५-३०
फणस४० ६०-७०
पालक ३० ४०-५०
मेथी ५० ७०-८०