राजस्थानमधील उंटांना तेलंगणातील कत्तलखान्याकडे नेले जात असल्याचा आरोप
By नरेश डोंगरे | Published: January 25, 2024 11:47 PM2024-01-25T23:47:55+5:302024-01-25T23:48:15+5:30
५० ते ६० उंटांची विदर्भात एन्ट्री : बचावासाठी सरसावले सेवाभागी नागरिक
नागपूर : वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाणाऱ्या उंटांना (कॅमल) कत्तल करण्यासाठी तेलंगणाकडे नेले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चार दिवसांपूर्वी उंटांचा हा कळप घेऊन संबंधित मंडळी खानदेशातून विदर्भात आल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे. या संबंधाने पोलीस यंत्रणांनी शोधाशोध चालविली आहे. निसर्गाने राजबिंडे रूप प्रदान केलेल्या उंटांची भारतीय सैन्यात स्वतंत्र तुकडी आहे. विदेशी सिमेवर ही तुकडी लष्करांसोबत देशाच्या रक्षणाचे काम करते, त्यामुळे उंटाला एक वेगळा मान आहे. उंटाला राजस्थानचा राज्य प्राणी (स्टेट एनिमल) म्हणूनही मान्यता आहे.
दरवर्षी उंटांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे त्याला राजस्थानबाहेर नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असून देखिल दरवर्षी थकलेल्या उंटांचा मोठा कळप पद्धतशिरपणे राजस्थानबाहेर काढून काही उंटांना रस्त्यात विकले जाते तर काही उंट कत्तलीसाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये नेले जातात. उंटांच्या देखभालीचे काम करणारी महावीर कॅमल सेंचुरी नामक एक संस्था असून या संस्थेचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी आज रात्री लोकमला दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर उंटांचा कळप काही जणांनी कत्तलीला तेलंगणात नेण्यासाठी पद्धतशिर बाहेर काढला. त्यातील काही उंटांना रस्त्यात विकण्यात आले तर ५० ते ६० उंटांचा कळप चार दिवसांपूर्वी विदर्भात पोहचला. बडनेरा, चांदूर मार्गे तो बुधवारी रात्री वर्धा जिल्ह्यात दाखल झाला.
संबंधितांच्या माहितीनुसार, आज दुपारी पुलगाव जवळच्या रसुलाबाद येथे अनेकांनी हा उंटांचा कळप बघितला. त्यानंतर सायंकाळी हा कळप जंगल मार्गाने वर्धा नजिकच्या भूगांव येथे पोहचला. रात्री तो आष्टा - अल्लीपूरकडे निघाला होता. ही माहिती कळताच सेंचूरीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याकडे गुरुवारी धाव घेतली. या उंटांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी अमरावती जिल्हा पोलीस यंत्रणेशीही संपर्क केला आहे.
पोलिसांकडून शोधाशोध
लोकमतला या प्रकराची कुणकुण लागताच प्रस्तूत प्रतिनिधीने अमरावती आणि वर्धा पोलीस यंत्रणेशी या संबंधाने संपर्क साधला. अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी दोन दिवसांपूर्वी चांदूरजवळ उंटांचा कळप दिसला होता. त्याची आम्ही संबंधितांकडून माहिती घेतल्यानंतर चाैकशी केल्याचे सांगितले. तर, वर्धा येथील पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी या संबंधाने पोलिसांची दोन पथके शोधाशोध करीत असल्याची माहिती दिली.
कोणत्याही परिस्थिती त्यांचा जीव वाचावा
भंडारी आणि सहकाऱ्यांची सेवाभावी संस्था असून राजस्थानमध्ये ती उंटांच्या संवंर्धनासाठी काम करते. गाैशाळेच्या धर्तिवर त्यांची तेथे उंटशाळाही आहे. गेल्या वर्षी नाशिकमध्ये अशाच प्रकारे त्यांनी राजस्थानमधून बाहेर नेला जात असलेला उंटांचा मोठा कळप पोलिसांच्या मदतीने पकडला होता. याही वेळेसाठी त्यांचे सहकारी वर्धेकडे धावले आहेत. कोणत्याही स्थितीत या उंटांचा जीव वाचवावा, अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क चालविला आहे.