कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:55 PM2020-09-15T12:55:35+5:302020-09-15T12:55:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, असा आरोप विविध सामाजिक संस्थांशी जुळलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, ही बाब लक्षात घेता ऑक्सिजनचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जोसेफ जॉर्ज, वीरेंद्र शाहू, वासुदेव मिश्रा, अनसूया काळे, विनोद छाबरानी आदींचा समावेश आहे. त्यांनी कोरोनाशी संबंधित विविध समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. शहरातील काही रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. तसेच, रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांकडून पीपीई किटचे पैसे वसूल केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णालयांतील खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना भरती होण्यासाठी खाटा मिळत नाहीत. परिणामी त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही. त्यातून अनेकांचा मृत्यू होत आहे. तसेच, अनेक रुग्णांना घरात क्वारंटाईन केले जात असल्यामुळे कुटुंबीयांना व संपर्कातील नातेवाईकांना कोरोनाची लागण होत आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
अर्जदारांनी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याचा आरोपही केला आहे. काही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत. त्यांची नियमित तपासणी केली जात नाही. परिणामी, वॉर्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. स्वतंत्र खोली भाड्याने घेऊ शकत नाहीत अशा रुग्णांना सामान्य वॉर्डात भरती केले जाते. त्यांच्या खाटा जवळजवळ असतात. दोन खाटांंच्या मधे काहीच लावलेले नसते. परिणामी, वातावरण चांगले राहत नाही. मधात पडदे लावून ही समस्या सोडवली जाऊ शकते. खासगी रुग्णवाहिकांसाठी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. नागरिकांना सरकारी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकारने रुग्णवाहिकांसाठी भाडे निश्चित करणे गरजेचे आहे, असेही अर्जदारांनी म्हटले आहे. न्यायालयात अर्जदारांतर्फे अॅड. एम. अनिलकुमार कामकाज पाहणार आहेत.
मृतदेह जिवंत रुग्णांजवळ ठेवले जातात
कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह तात्काळ हटवला जात नाही. मृतदेह जिवंत रुग्णांजवळ तासन्तास पडून राहतो. त्यामुळे नकारात्मक भावना निर्माण होते, या गंभीर बाबीकडे अर्जदारांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. तसेच, मयत कोरोना रुग्णांवर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.