डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
By admin | Published: October 20, 2016 03:15 AM2016-10-20T03:15:35+5:302016-10-20T03:15:35+5:30
औषधोपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत (वय १८) डॉक्टरने अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली.
लकडगंज आणि यशोधरानगरातही घटना : पोलिसांनी नोंदविले गुन्हे
नागपूर : औषधोपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत (वय १८) डॉक्टरने अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली.
पीडित युवतीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे लकडगंज आणि यशोधरानगरातही विनयभंगाचे गुन्हे घडले. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव संजू मिठूजी मेश्राम (वय ४८) आहे. तो शांतिनगर क्लिनीकमध्ये राहतो. त्याच्या क्लिनिकवर जीम आहे. तेथे पीडित युवती इन्स्ट्रक्टर असल्याचे समजते. १० आॅक्टोबरच्या दुपारी १ वाजता पीडित युवती बरे नसल्याने डॉक्टरकडे आली. तेथे तपासण्याच्या बहाण्याने मेश्रामने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केल्याचा युवतीचा आरोप आहे. हरकत घेतली असता डॉक्टरने याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे युवतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले. त्यामुळे शांतिनगर पोलिसांनी आरोपी डॉ. मेश्रामविरुध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.
अपहरणाच्या अन्य दोन घटना लकडगंज आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडल्या. तहसीलमधील २४ वर्षीय तरुणी आपल्या लकडगंजमधील दुकानासमोर स्कुटी उभी करीत असताना आरोपी आकाश चांडक (वय ३८, रा.धारस्कर मार्ग) याने तिला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यानंतर तिच्या दुकानासमोरचा सीसीटीव्ही कॅमेरा दंड्याने तोडून नुकसान केले. तसेच जीवानिशी मारण्याची धमकी दिली. सोमवारी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्याचप्रमाणे १६ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना आरोपी शेख सलमान शेख अकिल (वय २०) याने १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान तिचा रोज विनयभंग केला. तिने आपल्या गाडीवर बसावे म्हणून आरोपी तिला धमकावून शिवीगाळ करीत होता. या दोन्ही प्रकरणात पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)