आषाढीच्या पायी वारीला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:50+5:302021-06-18T04:06:50+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ...
नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे आषाढी वारीला संतांच्या परंपरागत रथामधूनच पालखी नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोहळे यांनी सरकारकडे केली आहे.
वारीला महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी आणि वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. असे असतानही अनलॉकच्या काळात मागील वर्षी वारकऱ्यांना वारी करता आली नाही. शासनाच्या निर्बंधाला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यंदा पायी वारी शक्य आहे. यंदाची वारी पायीच व्हावी अशी संपूर्ण वारकरी संप्रदायाची मागणी आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शासनाच्या निर्बंधानुसारच परवानगी मिळावी, अन्यथा ‘माझी वारी, माझी जबाबदारी’ या धर्तीवर सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन पायी वारी करतील, असा इशाराही पत्रातून दिला आहे. यंदाही संतांच्या पादुका बसने नेण्याला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ती कोणालाच रुचलेली नाही. अनलॉकमध्ये हॉटेल, सिनेमागृह, मॉल, दारूची दुकाने उघडली आहेत. सर्व संरक्षित स्मारकेही खुली करण्यात आली आहेत. देशात गर्दीने सभा आणि निवडणुका झाल्या. मात्र पायी वारीलाच परवानगी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
कुंभमेळा, जगन्नाथपुरी आदी यात्रेचे आयोजन करून संबंधित राज्यांनी सांस्कृतिक अस्मिता जोपासली. तशीच अस्मिता आषाढी वारीतही जोपासली जावी, यासाठी सरकार आणि वारकऱ्यांमध्ये समन्वय राखला जावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.