दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

By admin | Published: October 24, 2015 03:19 AM2015-10-24T03:19:03+5:302015-10-24T03:19:03+5:30

देशात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांचे संरक्षण करण्यात पोलीस तसेच देशातील गुप्तचर संस्थांही अपयशी ठरल्या आहेत.

Allow dalits to take weapons for self defense | दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

Next

केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार :
रामदास आठवले यांची मागणी

नागपूर : देशात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांचे संरक्षण करण्यात पोलीस तसेच देशातील गुप्तचर संस्थांही अपयशी ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. हरियाणा येथील फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाला जाळून मारण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख करीत खा. आठवले यांनी सांगितले की, १९ तारखेला ही घटना घडली. आपण स्वत: २० तारखेला पीडितांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. हरियाणा सरकारने ती मागणी पूर्ण केली. तसेच दहा लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली. रिपाइंतर्फे सुद्धा पीडितांना लवकरच एक लाख रुपयाची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार कुणाचे आहे, त्यामुळे दलितांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणता येणार नाही. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहे. जातीवादी मानसिकतेचे लोक अजूनही आहेत. विशेषत: गावांमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. या प्रकारांना आळा बसावा म्हणून अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अमलात आला होता. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचेही खा. आठवले यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करीत बेताल वक्तव्य असल्याचे ते म्हणाले. राज्यातील युती सरकारबद्दल त्यांना विचारले असता सरकारला कुठलाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्तेत सहभागी करून घेण्यासंदर्भात भाजपने शब्द दिला होता, तो त्यांनी पाळावा, याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली.
पत्रपरिषदेत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहन पटेल, भीमराव बनेड, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे डॉ. मनोज मेश्राम, पवन गजभिये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Allow dalits to take weapons for self defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.