मनपाला लस खरेदीची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:11+5:302021-05-07T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. याचा विचार करता नागपूर शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्याव्यतिरिक्त महापालिकेची स्वनिधीतून लस खरेदी करण्याची तयारी आहे. यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून केली असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेपूर्वी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका १० कोटी निधी खर्च करण्यास तयार असून पुढे सुद्धा निधीची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली.
लस खरेदीसाठी निधी देण्यासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांना विनंती केली आहे. तसेच मनपाचे सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून १० लाख रुपये , इच्छुक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी महापौर सहायता निधीमध्ये देण्यासाठी पत्र द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यातून १५ कोटी उपलब्ध होईल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार प्रवीण दटके व आमदार मोहन मते यांनी प्रत्येकी १ कोटी निधी देण्याचे पत्र दिले आहे. याशिवाय नागपूर शहरातील उद्योजक, कॉपोर्रेट क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचा सीएसआर निधी व इतरांनी लस खरेदी करण्यासाठी निधी द्यावा, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.