दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या!, विश्व हिंदू परिषदेची मागणी
By योगेश पांडे | Published: September 26, 2022 09:31 PM2022-09-26T21:31:47+5:302022-09-26T21:32:26+5:30
एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मदरशांमध्ये भेट देत सामाजिक समरसतेकडे पाऊल टाकले असता विहिंपच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर : नवरात्रीदरम्यान विविध ठिकाणी दांडिया-गरब्याचे सार्वजनिक आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी आधारकार्ड तपासावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मदरशांमध्ये भेट देत सामाजिक समरसतेकडे पाऊल टाकले असता विहिंपच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी ही मागणी केली आहे. दांडिया-गरब्यादरम्यान महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तसेच अनेक परिवार मोठ्या संख्येने गरबा बघण्यासाठी उपस्थित असतात. श्रद्धा नसतानादेखील इतर धर्मांचे लोक त्यात सहभागी होतात व त्यातूनच अनेकदा छेडखानी-लव्हजिहादचे प्रकार घडतात.
गरबा व दांडिया हे आपल्या संस्कृतीतील देवीच्या उपासनेची पद्धत आहे. हे केवळ मनोरंजन किंवा नृत्याचे आयोजन नसून धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. म्हणून या आयोजनामध्ये अन्य धर्मीय लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये. त्याकरिता आयोजकांनी आधार कार्ड बघून प्रवेश देण्याची व्यवस्था करावी. तसेच गरबा स्थानी गुन्हेगारी तत्त्व गैरफायदा घेत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करावी आणि आयोजकांनी सीसीटीव्ही लावावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासन व नागपूर पोलीस आयुक्तांनादेखील पत्र लिहीले आहे.