खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:06+5:302021-03-25T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर नागपूर शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.
महापौरांनी नमूद केले की, मुंबई आणि पुणे शहरामध्ये लसीकरणासाठी योग्य व्यवस्था, लस साठवण्याकरिता कोल्ड चेन स्पेस, लसीकरणासाठी प्रशिक्षित चमू आणि १०० खाटांच्या रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्या धर्तीवर नागपुरातील रुग्णालयांना परवानगी दिल्यास जास्तीत-जास्त लसीकरण करणे शक्य होईल. त्यामुळे मनपा आयुक्त यांनी ४ मार्चला एका पत्राव्दारे खासगी रुग्णालयांना अनुमती देण्याची विनंती केली होती. परंतु याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे १ एप्रिलपासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. शासनाने जर खासगी रुग्णालयांना परवानगी दिली तर जास्तीत जास्त नागरिकांना लस देणे शक्य होईल, असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.