‘त्या’ विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची परवानगी

By admin | Published: February 26, 2017 03:04 AM2017-02-26T03:04:25+5:302017-02-26T03:04:25+5:30

नशिबाने अचानक थट्टा मांडली आणि वर्गात अत्यंत हुशार असलेला बारावीचा एक विद्यार्थी लैंगिक

Allow the student to take the examination | ‘त्या’ विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची परवानगी

‘त्या’ विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची परवानगी

Next

पोक्सो न्यायालयाचा आदेश : जेलर नेणार परीक्षा केंद्रावर
नागपूर : नशिबाने अचानक थट्टा मांडली आणि वर्गात अत्यंत हुशार असलेला बारावीचा एक विद्यार्थी लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) च्या गुन्ह्यात अडकला. पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. २८ फेब्रुवारीपासून त्याची परीक्षा प्रारंभ होत असून कारागृहाच्या जेलरने या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर न्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
चिंटू रमेश पाटील, असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून तो वाडी येथील रहिवासी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा गुन्हा आहे. ३० डिसेंबर २०१६ रोजी पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनी ही शिकवणी वर्गाला गेली होती. रात्री ८ वाजताच्या सुमारास ती आपल्या तीन मित्रांसोबत घरी जाण्यास निघाली होती. नवनीतनगरच्या नाल्याजवळ अचानक अज्ञात तीन मुलांनी पीडित मुलीच्या सोबत असलेल्या मुलांना मारहाण करून हाकलून तिच्यावर अत्याचार केला होता.
पीडित मुलीच्या आईने २३ जानेवारी २०१७ रोजी नोंदवलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३५४ अ (२), २९४, ५०६ ब आणि पोक्सोच्या कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून इम्रान रहेमान शेख, चिंटू रमेश पाटील आणि दिनेश गोविंदराव पवार यांना अटक केली होती. २३ जानेवारी रोजीच या तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांना थेट न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून त्यांना जामीन दिला होता.
पीडित मुलीच्या चौकशीत तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड होताच पोलिसांनी ८ फेब्रुवारी रोजी आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी आणि भादंविच्या ३७६ कलमांतर्गतचा गुन्हा वाढविण्याची न्यायालयाला विनंती केली होती. दरम्यान बलात्काराचा गुन्हा दाखल न केल्याने वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खनदाळे यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. पोलिसांच्या अर्जावर न्यायालयाने तिन्ही आरोपींना नोटीस जारी करून १७ फेब्रुवारी २०१७ रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. तिन्ही आरोपी हजर होताच न्यायालयाने तिन्ही आरोपींना त्यांच्याविरुद्धचे आरोप गंभीर असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत घेऊन त्यांची कारागृहाकडे रवानगी केली होती.
या प्रकरणातील कारागृहात असलेला आरोपी चिंटू पाटील हा बारावी ‘एमसीव्हीसी’ चा विद्यार्थी असल्याने आणि त्याची परीक्षा असल्याने परीक्षेला बसू देण्याची परवानगी मागणारा अर्ज आरोपीच्यावतीने अ‍ॅड. सौरभ राऊत यांनी न्यायालयात केला. शाळा प्रशासनानेही न्यायालयाला चिंटू पाटील हा नियमित आणि हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले होते. अ‍ॅड. राऊत यांनी आपल्या युक्तिवादात असे म्हटले होते की, प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार आहे. आरोपीला परीक्षेची परवानगी मिळाली नाही तर त्याचे पुढचे भविष्य उद्ध्वस्त होईल.
जोपर्यंत शिक्षा होत नाही तो पर्यंत आरोपीला निरपराध म्हणूनच गृहीत धरले जावे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, त्याचप्रमाणे या आरोपीला चांगला नागरिक होण्याची संधी देण्यात यावी, असेही ते आपल्या युक्तिवादात म्हणाले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरीत आरोपीला परीक्षेस बसण्याची परवानगी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Allow the student to take the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.