संकटातील व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:34+5:302021-05-20T04:07:34+5:30
नागपूर : लॉकडाऊनने व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय बंद असून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली झाल्याने ...
नागपूर : लॉकडाऊनने व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय बंद असून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली झाल्याने सर्व वर्गवारीतील व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी देण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) केली आहे.
यासंदर्भात चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्त्वात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन नियमांतर्गत व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचे निवेदन दिले.
मेहाडिया म्हणाले, राज्य शासनाने एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व वर्गवारीतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊन कठोर निर्बंध लावले आहेत. आता लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविले आहे. नागपुरातील व्यापारी मार्च २०२१ पासूनच लॉकडाऊनचा फटका सहन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना झाले आहे. सरकारने या व्यापाऱ्यांसाठी आर्थिक मदत वा कोणत्याही पॅकेजची घोषणा केलेली नाही. व्यवसाय बंद असल्याने कामगार, हॉकर्स, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, चहावाले, हातठेला मजूर, फूटपाथवरील चहा-नाश्ता दुकानदारांचा व्यवसाय बंद आहे. व्यापारी आर्थिक समस्यांनी मानसिक आजाराचे रुग्ण झाले आहेत.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यापारी उद्योगातर्फे निर्मित माल ग्राहकांपर्यंत पोहोचवितो. याशिवाय व्यापारीच कर संग्रहण करून सरकारी खजान्यात जमा करतो. त्याच्या भरवशावर सरकार चालते. जर व्यवसायच बंद राहिला तर कर कुठून भरणार, हा प्रश्न आहे.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, नागपूर शहराने कोरोना महामारीवर अनेक प्रमाणात मात केली आहे. नागपुरात कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी झाली आहे. अनेक प्रमाणात रुग्ण ठीक होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना सूट देऊन नियमांतर्गत आर्थिक सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे व्यापाऱ्यांवरील आर्थिक संकट दूर होईल.
मनपा आयुक्त म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करून जर नागरिक आणि व्यापाऱ्यांचे कोरोना महामारी रोखण्यासाठी सहकार्य प्राप्त होत असेल तर राज्यात १ जूनपासून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो. दुकाने सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी कोविड नियमाचे पालन करावे. मास्कविना ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकानदारांनी ग्राहकांसाठी अतिरिक्त मास्क दुकानात उपलब्ध करावेत. बाजारात गर्दी झाल्यास आणि कोरोना महामारीचे संकट पुन्हा आल्यास दुकाने पुन्हा बंद करावी लागतील, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी करावी.
निवेदन देताना चेंबरचे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष-सचिन पुनियानी, कार्यकारिणी सदस्य राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.