पॅसेंजर गाड्यातून प्रवासाची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:51+5:302021-02-23T04:09:51+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सोमवारपासून पॅसेंजर व मेमू रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. रेल्वेच्या मासिक ...
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सोमवारपासून पॅसेंजर व मेमू रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. रेल्वेच्या मासिक पासधारकांनीही स्पेशल ट्रेनमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी लावून धरली आहे.
कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. नंतरच्या काळात प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. पण, नियमित गाड्या टाळून केवळ विशेष गाड्याच सुरू आहेत. त्यातही केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश आहे. वर्षोनुवर्षे रेल्वेतून अपडाऊन-करणाऱ्या मासिक पासधारकांनाही प्रवासाची परवानगी नाही. कोरोनापूर्व काळात नागपूरहून भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोलापर्यंत अपडाऊन करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. त्यात शासकीय व खासगी कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक, दूध विक्रेते व शेतमाल विक्रेत्यांची संख्या मोठी होती. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन या अपडाऊन करणाºयांनी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडला. परंतु आता इतवारी- छिंदवाडा दरम्यान पॅसेंजर ट्रेन आणि इतवारी -गोंदिया दरम्यान मेमू चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर मासिक पासधारकांनाही प्रवासाची मुभा द्यावी तसेच गरज असल्यास अतिरिक्त कोच जोडावा, अशी त्यांची मागणी आहे.
...........
मासिक पासधारकांना प्रवासाची परवानगी द्यावी
‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पॅसेंजर आणि मेमु गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेने अपडाऊन करणाऱ्यांना या गाड्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्याची गरज आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
..........