खडू-फळ्याच्या साथीने आता वनरक्षकही देणार ग्रीन एज्युकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:42+5:302021-09-07T04:11:42+5:30

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक यापुढे जंगलातील जबाबदारी सांभाळण्यासोबतच बफर झोनमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन वन, वन्यजीव आणि ...

Along with the chalk-board, now the forest rangers will also give green education | खडू-फळ्याच्या साथीने आता वनरक्षकही देणार ग्रीन एज्युकेशन

खडू-फळ्याच्या साथीने आता वनरक्षकही देणार ग्रीन एज्युकेशन

googlenewsNext

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक यापुढे जंगलातील जबाबदारी सांभाळण्यासोबतच बफर झोनमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन वन, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाचे शिक्षण देणार आहेत. बीटमध्ये गस्त घालण्यासोबतच बालकांच्या मनात जंगल आणि पर्यावरणाचे प्रेम जागृत करून त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचा हा अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये हाती घेण्यात आला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्या संकल्पनेतून येथे ‘वन अध्यापक योजना’ हा उपक्रम राबविला जात आहे. नागपूर जिल्हा परिषद आणि आदिवासी प्रकल्प विभागाचे या कामी सहकार्य घेतले जाणार आहे.

या उपक्रमासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोवेकर म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ४० गावे येतात. लगतची मिळून ७० ते ८० गावे जंगलालगत आहेत. या सर्व गावांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये हे वनरक्षक आठवड्यातील ठरावीक दिवशी जाऊन प्रत्यक्ष वर्गात शिकविणार आहेत. वनविभागात अनेक वनरक्षक बीएड, बीपीएड झालेले आहेत. त्यांच्या शिक्षणाचा या योजनेत उपयोग करून घेतला जाईल. यासाठी ५० वनरक्षकांची ‘वन अध्यापक’ म्हणून निवड केली असून त्यांना मुलांच्या मानसशास्त्राचे प्रशिक्षण दिले जाईल. पर्यावरणीय बदल, जलसंवर्धन, वन व वन्यजीवरक्षण, पर्यावरण रक्षण, जैवविविधतेचे पोषण असे हे बहुविध ग्रीन एज्युकेशन असेल. या वन अध्यापकांना वनविभागाकडून साहित्य, प्रोजेक्टर, गणवेशावर बॅच, प्रवास खर्च आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यापूर्वी २०१६-१७ मध्ये नवेगाव नागझिरामध्ये क्षेत्र संचालक असताना गोवेकर यांनी हा उपक्रम स्थानिक पातळीवर चालविला होता. लवकरच पूर्व पेंचमध्ये या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.

...

कोट

नागरिकांना वनसंवर्धन आणि वन्यजीव रक्षणासाठी सतत जागृत केले जाते. हाच संदेश बालमनावर आतापासून बिंबविला तर हे उद्याचे नागरिक स्वत:हून वन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येतील. त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन परिणाम दीर्घकालीन राहतील. त्यांच्यातील वनविभागासंबंधीचे गैरसमज कमी होऊन खाकी वर्दीमधील वनकर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वयाचे नाते निर्माण होईल.

- डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

...

प्रशासनाकडून स्वागत

शिक्षक दिनाचे औचित्य साधून वन अध्यापक म्हणून निवडलेल्या वनरक्षकांना प्रमाणपत्र देऊन योजनेची माहिती देण्याचा कार्यक्रम अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांच्या उपस्थितीत झाला. ही योजना जिल्हाभर राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिले.

...

Web Title: Along with the chalk-board, now the forest rangers will also give green education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.