कांद्यापाठोपाठ बटाट्याचे दरही घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:31+5:302021-03-24T04:07:31+5:30
- छिंदवाडा, आग्रा, कानपुरी येथून होतेय आवक दररोज उतरत आहेत ३५० टन : छिंदवाडा, आग्रा, कानपुरी येथून होतेय ...
- छिंदवाडा, आग्रा, कानपुरी येथून होतेय आवक
दररोज उतरत आहेत ३५० टन : छिंदवाडा, आग्रा, कानपुरी येथून होतेय आवक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी उत्पादकांनी उगवलेला माल आता बाजारात उतरायला लागल्याने कृषी उत्पन्नाचे दर घसरत असल्याचे दिसून येत आहे. बटाट्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर प्रचंड घसरले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत वर्तमान दर निम्म्यावर आले आहेत.
छिंदवाडा, आग्रा, कानपूर येथून बटाट्याचे वितरण देशभरात होत असते. कृषी उत्पादकांनी बटाटे बाहेर काढले असून, ते बाजारात उतरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, किमती प्रचंड घसरल्या आहेत. गेल्या महिन्यात जे बटाटे किरकोळ बाजारात ४०-५० रुपये किलो दराने विकले ते बटाटे वर्तमानात २०-२५ रुपये किलो दराने विकले जात आहेत. साधारणतः में महिन्यापर्यंत माल उतरत राहणार असल्याने ग्राहकांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब असणार आहे.
--------
बटाट्याचे वर्तमान दर
ठोक बाजारात बटाटे ३५० ते ३८० रुपये मन (४० किलो) दराने कळमना येथे उपलब्ध होत आहेत. ९ ते १० रुपये किलो असा हा दर पडतो. किरकोळ बाजारात हाच बटाटा १५ ते २० रुपये किलो दराने ग्राहकांना उपलब्ध होत आहे.
-------
इंदुरी बटाटा ४८० रुपये मन
इंदूर येथून येणार इंदुरी बटाटा हा ४८० रुपये मन दराने ठोक बाजारात उपलब्ध होत आहे. १२ ते १३ रुपये किलो असे हे दर होतात. किरकोळ बाजारात हेच दर २० ते २५ रुपये किलो असे होतात. इंदुरी बटाटा हा चिप्स करिता मागवला जातो, हे विशेष.
------
बटाट्याचे उतरते दर (मन = ४० किलो)
नोव्हेंबर-डिसेंबर : १००० ते १२०० रुपये
जानेवारी-फेब्रुवारी : ४५० ते ६०० रुपये
मार्च : ३५० ते ३८० रुपये
------
किरकोळ बाजारातील उतरते दर (प्रति किलो)
नोव्हेंबर-डिसेंबर : ६० ते ८० रुपये
जानेवारी-फेब्रुवारी : ४० ते ५० रुपये
मार्च : १५ ते २० रुपये
...........