समाजमनासोबतच राजकीय नेतेदेखील हेलावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:24+5:302021-01-10T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील समाजमन ...

Along with the society, political leaders were also shaken | समाजमनासोबतच राजकीय नेतेदेखील हेलावले

समाजमनासोबतच राजकीय नेतेदेखील हेलावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील समाजमन हेलावले आहे. राजकीय क्षेत्रातूनदेखील यासंदर्भात हळहळ व्यक्त करण्यात आली व दिल्लीपासूनच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळीच या घटनेबाबत शोक व्यक्त केला. त्यांच्यासोबतच गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बालकांना श्रद्धांजली अर्पण केली.

हदयद्रावक घटना

भंडारा येथे घडलेली घटना ही हृदयद्रावक व मन हेलावून टाकणारी घटना आहे. नवजात बालकांचे मौलिक आयुष्य यात हरविले आहे. त्यांच्या मातांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वेदनादायी घटना

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख व वेदना झाली. या घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो.

- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र

वेदना शब्दांत मांडणे अशक्य

भंडाºयात घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या वेदना शब्दांतदेखील मांडणे शक्य नाही. मृत बालकांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना आहेत. कधीही भरुन न निघणारी ही पोकळी दूर करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

पीडित कुटुंबीयांना सर्वप्रकारची मदत मिळावी

नवजात बालकांचा मृत्यू होणे ही अतिशय वेदनादायी घटना आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. या घटनेतील मृत व जखमी बालकांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाने हरतऱ्हेने मदत करावी, असे मी आवाहन करतो.

-राहुल गांधी, नेते, कॉंग्रेस

अतिशय दुर्दैवी घटना

१० बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी आहे. ज्या कुटुंबातील मुलांच्या या घटनेमुळे मृत्यू झाला त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

सर्व रुग्णांलयांचे ऑडिट करणार

ही घटना अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

-अजित पवार, उपमुख्यमंत्री

घटनेचे ‘फायर ऑडिट’ होणार

ही अतिशय वेदनादायक घटना आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नॅशनल फायर कॉलेज आणि व्हीएनआयटी कॉलेज मिळून या घटनेचे फायर ऑडिट करतील.

- अनिल देशमुख, गृहमंत्री

भविष्यातील घटना टाळण्यासाठी...

कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि राज्य सरकार सहभागी आहोत. भविष्यात अशा दुर्घटना राज्यात घडू नयेत म्हणून पावले उचलली जातील. भंडारा येथील दुर्घटनेशी संबंधित कारणांचा ऊर्जा विभागातर्फे शोध घेण्यात येईल.

-नितीन राऊत, उर्जामंत्री

दोषींवर कठोर कारवाई व्हावी

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मन खिन्न करणारी घटना

भंडारा येथील घटना खरेच हृदयद्रावक आहे. मन खिन्न करणारी ही घटना निष्पाप चिमुकल्यांसोबत घडावी यावर विश्वासच बसत नाही. त्या निष्पाप चिमुकल्यांच्या प्रती संवेदना प्रकट करतो व त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

- सुनील केदार, क्रीडामंत्री

ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या गंभीर घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. मृत बालकांच्या कुटुंयांीच्या दु:खात सहभागी आहोत.

-विजय वडेट्टीवार, पुनर्वसनमंत्री

सर्व ग्रामीण रुग्णालयांचे व्हावे फायर ऑडीट

भंडारा येथील घटना अतिशय दु:खदायी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालयातील फायर ऑडिट करण्यात यावे.

-सुलेखा कुंभारे, माजी राज्यमंत्री

Web Title: Along with the society, political leaders were also shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.