दातांच्या उपचारासोबतच आता ‘हेअर ट्रान्सप्लांट’लाही परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 07:45 AM2023-02-17T07:45:00+5:302023-02-17T07:45:02+5:30
Nagpur News ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (डीसीआय) ‘एमडीएस ओरल सर्जरी’ अभ्यासक्रमात ‘हेअर ट्रान्सप्लांट’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा डॉक्टरांसह रुग्णांनाही होणार आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय किंवा खासगी दंत रुग्णालयात दंतोपचारासोबत लवकरच ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची सुविधाही उपलब्ध होणार आहे. ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (डीसीआय) ‘एमडीएस ओरल सर्जरी’ अभ्यासक्रमात ‘हेअर ट्रान्सप्लांट’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा डॉक्टरांसह रुग्णांनाही होणार आहे.
अकाली टक्कल पडल्यामुळे आजची युवा पिढी त्रस्त आहे. टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. आधीच्या काळात चाळीशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, अयोग्य जीवनशैलीमुळे विशीतच पडायला लागले आहे. टक्कल पडण्याच्या वाढत्या समस्येने नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘डीसीआय’ने घेतलेला हा निर्णय किती फायद्याचा ठरणार, हे आगामी काळात दिसून येणार आहे.
‘डीसीआय’ने अभ्यासक्रमात केले बदल
केस प्रत्यारोपणासाठी आतापर्यंत फक्त प्लास्टिक सर्जन आणि प्रशिक्षित त्वचारोग तज्ज्ञांनाच अधिकृत केले जात होते. नुकतेच काढलेल्या ‘डीसीआय’चा पत्रात ‘ओरल’ व ‘मॅक्सिलोफेशियल’ म्हणजे दात व जबडा तसेच संपूर्ण चेहऱ्याशी संबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्यांना ‘हेअर ट्रान्सप्लांट’ही करता येणार आहे.
केस प्रत्यारोपणासाठी या सोयींची गरज
प्रशिक्षण प्राप्त ‘ओरल’ व ‘मॅक्सिलोफेशियल’ तज्ज्ञाच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियागृहासह ‘पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी रूम’ आवश्यक असणार आहे. याशिवाय औषधांचा साठा, ‘बॉयल्स मशिन’, ‘इंट्यूबेशन सेट’, ‘ॲम्बू बॅग’सह आपत्कालीन परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासह ती हाताळण्याची सुविधा असणे गरजेचे असणार आहे.
आवश्यक मनुष्यबळ
‘हेअर ट्रान्सप्लांट’ करताना बधिरीकरण तज्ज्ञासह प्रशिक्षित शस्त्रक्रियागृह कर्मचारी, परिचारिका व तंत्रज्ञ असणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाल्यास जवळील रुग्णालयाशी हे सेंटर संलग्न असले पाहिजे.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर छायाचित्र काढावे लागणार
हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या रुग्णांच्या योग्य नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. शिवाय शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर रुग्णाचे छायाचित्र काढावे लागणार आहे.
शासकीय रुग्णालयात या सेवेला लागणार वेळ
ओरल व मॅक्सिलोफेशिअल तज्ज्ञांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षण व सोयी असणे गरजेचे आहे. या निर्णयाने ‘हेअर ट्रान्सप्लांट सर्जन’ची संख्या वाढणार आहे. शासकीय दंत रुग्णालयांमध्ये हा नवीन विभाग सुरू करण्यास थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.
- डॉ. विकास धुपर, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया