ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानासोबतच ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’चा ‘सोशल’ चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 07:00 AM2023-01-05T07:00:00+5:302023-01-05T07:00:11+5:30

Nagpur News अयोध्येजवळील एका गावात राहून मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेला ‘इंडियन वुमेन्स कॉंग्रेस’च्या निमित्ताने नागपूरला विशेष बोलविण्यात आले आहे. संगीता दुबे असे संबंधित शिक्षिकेचे नाव असून, संघर्षातून समोर येत त्या समाजातील मुलींसाठी झटत आहेत.

Along with knowledge-science-technology, the 'social' face of 'Indian Science Congress' | ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानासोबतच ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’चा ‘सोशल’ चेहरा

ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानासोबतच ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’चा ‘सोशल’ चेहरा

googlenewsNext
ठळक मुद्देसमाजात विधायक कार्य करणाऱ्या अयोध्येतील शिक्षिकेला केले निमंत्रित


योगेश पांडे

नागपूर : ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच क्षेत्रावरील मान्यवर आलेले नाहीत. तर समाजात विधायक कार्य करून वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येजवळील एका गावात राहून मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेला ‘इंडियन वुमेन्स कॉंग्रेस’च्या निमित्ताने नागपूरला विशेष बोलविण्यात आले आहे. संगीता दुबे असे संबंधित शिक्षिकेचे नाव असून, संघर्षातून समोर येत त्या समाजातील मुलींसाठी झटत आहेत.

उत्तर प्रदेशमधील अनेक दुर्गम भागात आजदेखील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. कुटुंबीयांकडूनच त्यांचे शिक्षण थांबविले जाते. अगदी आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या घरातदेखील असेच चित्र असते. हीच बाब लहानपणापासून पाहत असल्याने संगीता यांनी या दिशेने प्रयत्न करण्याचा संकल्पच केला. त्यांनी ‘जीएसएम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली व कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली. अयोध्येपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडा येथील एका महाविद्यालयात त्या गृहविज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. प्रसंगी आपल्या वेतनातील पैसे खर्च करून त्यांनी अनेक मुलींना शिक्षित केले. त्या भागात अनेक मुली आठवी-नववीच्या शिक्षणानंतर मजुरी करण्यासाठी जातात. त्यांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. सोबतच अनेक गरीब मुलींच्या लग्नासाठीदेखील त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची माहिती ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांना मिळाली व त्यांना ‘इंडियन वुमेन्स कॉंग्रेस’साठी निमंत्रित करण्यात आले आहे.

 

संघर्षातून घडविले करिअर

संगीता यांचा जीवनप्रवासदेखील संघर्षाचाच राहिला आहे. लहान गावात असूनदेखील त्यांनी जिद्दीने गृहविज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. लग्नानंतर काही कालावधीतच पतीचे निधन झाले. मात्र, त्या डगमगल्या नाहीत. तीन महिन्यांचा मुलगा असताना त्यांनी नोकरीला सुरुवात केली व सोबतच पीएच.डी.देखील पूर्ण केली. या दरम्यान त्यांनी आजूबाजूच्या कुटुंबांतील मुलींचा शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष पाहिला व त्यातूनच त्यांनी विधायक कार्य हाती घेतले. ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये मला बोलविणे हा विज्ञान व महिलांचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Along with knowledge-science-technology, the 'social' face of 'Indian Science Congress'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.