डाळींसोबत खाद्यतेलाचे दरही महागले; स्वयंपाकघरातील वस्तू महाग
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 12, 2024 07:41 PM2024-06-12T19:41:14+5:302024-06-12T19:41:26+5:30
डाळींच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या तर आता खाद्यतेलाचे भावही वाढले
नागपूर : रोजचा दिवस काहींना काही तरी भाव वाढ घेऊन येतो. डाळींच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या तर आता खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. सध्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा पूर्वीसारखा होत नाही. उन्हाळ्यात खास लोणच्यासाठी वापरले जाणारे मोहरीचे तेल प्रति किलो १० रुपयांनी महाग होऊन १४० रुपयांवर पोहोचले आहे.
वाढत्या महागाईच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असताना आता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू होताच महागाईचा भडकाही उडाला आहे. डाळी आधीच १९० रुपयांपर्यंत पोहोचल्या तर आता सर्वच खाद्यतेल महागले आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून होणाऱ्या सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे तसेच देशांतर्गत मोहरीचे तेल महागणे भाववाढ मागचे कारण सांगितले जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख टन सोयाबीन तेलाची आयात केली जाते.
आयात शुल्क १५ वरून शून्य टक्के
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. त्यानंतरही खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यावेळी खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले होते.
खाद्यतेलाचा किरकोळ भाव तक्ता :
खाद्यतेल महिन्याआधीचे भाव सध्याचे भाव
सोयाबीन १०८ ११३
सूर्यफूल ११५ १२०
राईस ब्रान ११० ११५
पाम १०५ ११०
मोहरी १३० १४०
जवस १२० १२५
शेंगदाणा १७५ १८०
भाव आणखी वाढण्याची शक्यता
गेल्यावर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती कमीच आहे. दोन महिन्यांआधी दर वाढले होते. त्यानंतर कमी झाले आणि आता ५ ते १० रुपयांनी पुन्हा वाढले. ही दरवाढ मोठी नाही. किरकोळमध्ये सर्वाधिक विकणारे सोयाबीन तेल ११३ रुपये आणि पाम तेलाचे दर ११० रुपये किलो आहेत. विदेशात सोयाबीन, पाम व सूर्यफूलाचे जास्त उत्पादन झाले आहे. स्थानिक बाजारात पुढे भाव कमी न होता वाढतील.
अनिल अग्रवाल, खाद्यतेल व्यापारी.