आधीच तीन हजार कोटींवर नुकसान, आता लॉकडाऊन नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:10+5:302021-03-31T04:08:10+5:30

करायचे? नागपूर : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आणि रुग्णांची साखळी मोडून काढण्यासाठी सरकार व प्रशासन लॉकडाऊनचा मार्ग निवडते. गेल्या वर्षात ...

Already a loss of Rs 3,000 crore, now don't deny the lockdown | आधीच तीन हजार कोटींवर नुकसान, आता लॉकडाऊन नकोच

आधीच तीन हजार कोटींवर नुकसान, आता लॉकडाऊन नकोच

Next

करायचे?

नागपूर : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आणि रुग्णांची साखळी मोडून काढण्यासाठी सरकार व प्रशासन लॉकडाऊनचा मार्ग निवडते. गेल्या वर्षात लॉकडाऊनमुळे एकट्या नागपूर शहरात व्यापाऱ्यांचे तब्बल ३,१०० कोटींवर नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर आता मार्चमध्ये मनपा प्रशासनाने १५ दिवसांचे लॉकडाऊन लावले. या १५ दिवसातही सुमारे दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा कठोर निर्बंधासह लॉकडाऊन लावण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे उद्योग-व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असून अनेकांना आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय अनेकांची दुकाने, प्रतिष्ठाने, व्यापार बंद होण्याची भीती आहे. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने लॉकडाऊनऐवजी दुसरा पर्याय शोधावा. पण लॉकडाऊन नकोच, अशी तीव्र भूमिका व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना मांडली.

सर्व दुकानदारांना दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची सूट देण्यासह प्रशासनाने लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढविला. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी दुपारीच मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत. गेल्या १५ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन कठोर निर्बंधासह १ एप्रिलपासून लावण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. अनेक व्यापारी संघटनांनी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनदरम्यान व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवू नयेत, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

व्यापारी म्हणाले, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आणि मास्कविना येणाऱ्या ग्राहकाला वस्तू विक्री न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. सर्व व्यावसायिक कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. पण ग्राहकांच्या गर्दीपुढे ते सुद्धा हतबल आहेत. मास्क आणि सॅनिटायझरच्या वापरावरून ग्राहकांसोबत वाद होत आहे.

लॉकडाऊनमध्ये ग्राहक बाजारात अनावश्यक फिरत आहेत. अनावश्यक खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात येऊ नये, असे आवाहन व्यापारी संघटनांनी केले आहे. पण कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पूर्वीप्रमाणेच इतवारी, महाल, गांधीबाग, सीताबर्डी, सदर, धरमपेठ आदींसह अन्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्याच कारणांनी प्रशासनाने कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान

वर्ष २०२० - ३,१०० कोटी

१५ ते ३१ मार्च - १५० कोटी

व्यापारी आर्थिक डबघाईस येणार

वाढत्या कोरोना रुग्णावर लॉकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही. लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना खर्च आणि नफ्याचा ताळमेळ साधणे शक्य नाही. व्यापाऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच आहे. लॉकडाऊन नकोच. कडक नियमांसह निर्बंध लादू नये.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

आवक थांबल्याने आर्थिक नुकसान

लॉकडाऊनमध्ये दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने बाहेरचे जिल्हे आणि राज्यातून आवक थांबल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. सर्वच संकटात आले आहेत. निर्बंध लावा, पण ते कठोर असू नयेत.

शिवप्रताप सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष, इतवारी ठोक किराणा असोसिएशन.

दुकानांवर वेळेची मर्यादा नको

जीवनावश्यक असो वा अन्य दुकानांवर वेळेची मर्यादा टाकूच नये. लॉकडाऊन लावून शासन काय साधत आहे, हे कळत नाही. व्यापारी सर्व नियम पाळत आहेत, याउलट ग्राहक विनाकारण बाजारात फिरत आहेत. त्यांच्यावर निर्बंध आणणे महत्त्वाचे आहे.

पुरुषोत्तम कावळे, उपाध्यक्ष, सोना-चांदी ओळ कमिटी.

लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा

मनपा प्रशासनाचा लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे सर्वच व्यापारी संकटात आले आहेत. बँकांचे हप्ते, वीज बिल, कर्मचाऱ्यांचे पगार शिवाय अन्य खर्च व्यापाऱ्यांना खिशातून करावा लागत आहे. लॉकडाऊनने समस्या सुटणार नाही, हा निर्णय चुकीचा आहे.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

लॉकडाऊनमुळे उद्योगांचे नुकसान

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये काही महिने बंद राहिलेल्या उद्योगांमुळे उद्योजक आणि शासनाचे कोट्यवधींच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरून निघणार नाही. वाढत्या कोरोना रुग्णांवर लॉकडाऊन हा पर्याय ठरत नाही. शासनाने पर्याय शोधून रुग्णसंख्या कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन.

Web Title: Already a loss of Rs 3,000 crore, now don't deny the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.