जनसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षिकेचे आईपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:50+5:302021-05-09T04:07:50+5:30
निशांत वानखेडे नागपूर : कोरोनाच्या सावटाखाली प्रत्येकालाच स्वत:ची व कुटुंबाची काळजी लागलेली आहे. मात्र, या काळातही विविध विभागांतील कर्मचारी ...
निशांत वानखेडे
नागपूर : कोरोनाच्या सावटाखाली प्रत्येकालाच स्वत:ची व कुटुंबाची काळजी लागलेली आहे. मात्र, या काळातही विविध विभागांतील कर्मचारी आवश्यक सेवा बजावत जनसेवेचे कार्य करीत आहेत. महापालिका शाळेच्या शिक्षिका सरोज लाड या त्याच जनसेवकांच्या प्रतिनिधी होत. घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समुपदेशनाचे काम त्या गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. अशा धोक्याच्या परिस्थितीत सेवा बजावताना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांची धडपड चालली आहे.
सरोज अशोक लाड या लक्ष्मीनगर झोनअंतर्गत विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेत गेल्या २९ वर्षांपासून शिक्षक म्हणून सेवा देत आहेत. तसे कुटुंब सुखवस्तूच आहे. गेल्या वर्षी मार्चपासून जगभरासह भारतावरही कोरोनाचे संकट ओढवले. त्यावेळी लॉकडाऊन लागल्यानंतर शाळा बंद झाल्या. विद्यादानाचे काम थांबले; पण कार्यालयीन आदेश धडकला. शिक्षकांना शहरात घराेघरी जाऊन काेराेना रुग्णांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. सराेज सांगतात, त्यावेळी एक अनामिक भीती मनात भरली हाेती. त्यांना जयताळा परिसरात काम करायचे हाेते. साेबत टीममध्ये आणखी तीन महिलाही आहेत. भीती असली तरी नाेकरीचा भाग म्हणून ते करावेच लागणार हाेते. घराेघरी जाऊन काेराेना रुग्णांचे सर्वेक्षण, रुग्ण असल्यास त्यांची ऑक्सिजन लेव्हल व इन्फेक्शनची स्थिती याबाबत माहिती घेणे, रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन, रुग्णाचे कुटुंबीय व आसपासच्या लाेकांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग हा त्यांच्या कामाचा भाग. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या हे कार्य करीत आहेत.
सुरुवातीला भीती वाटली; पण पुढे आपण राष्ट्रीय कर्तव्य बजावत असल्याचा अभिमान वाटायला लागल्याचे त्या सांगतात. मात्र, या काळात हिमतीची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग आले. पुण्यात नाेकरी करणारा मुलगा व सून लाॅकडाऊनमुळे घरी आले. घरात वयाेवृद्ध सासू आहे. कर्तव्य बजावताना त्यांच्या आराेग्याची चिंता सातत्याने लागली असते. दरम्यान, यावर्षी दीड महिन्यापूर्वी त्यांचे पती अशाेक यांना काेराेनाची लागण झाली. सुदैवाने ते यातून सुखरूप बाहेर निघाले. मात्र, या काळात करावा लागलेला संघर्ष अनाकलनीय राहिल्याचे त्या सांगतात. कुटुंबीयांची देखभाल आणि कर्तव्य निभावताना तारेवरची कसरत करण्यासारखा अनुभव आला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे जनसेवेचे कार्य करणारे ८० टक्के कर्मचारी काेराेना संक्रमित झाले. काही लाेकांचे निधनही झाले. साेबत काम करणारे त्यांच्या टीममधील कर्मचारीही पाॅझिटिव्ह निघाले. त्यामुळे भीती वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली; पण हिंमत आणि सुरक्षेविषयीची नियमावली पाळून कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.