चार महिने राहील एक दिवसाआड पाणी : नागपुरात पाण्याची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:20 PM2019-07-17T21:20:22+5:302019-07-17T21:28:57+5:30

जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून डेड स्टॉक फक्त शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मनपा, जि.प., जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Alternate day water for four months : The water situation in Nagpur is worrisome | चार महिने राहील एक दिवसाआड पाणी : नागपुरात पाण्याची स्थिती चिंताजनक

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.

Next
ठळक मुद्देफक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणीपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : फक्त पाणीटंचाईकडेच लक्ष केंद्रित करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून डेड स्टॉक फक्त शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मनपा, जि.प., जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नासुप्रच्या सभागृहात पाणी आरक्षणाबद्दल एक बैठक पालकमंत्री बावनकुळे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
शहराला फक्त ३५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असून, नुकताच सुरू केलेला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती चार महिन्यापर्यंत राहू शकते, असा अंदाज या बैठकीत अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. तोतलाडोह जलाशयातून मनपा जलप्रदाय विभागाचे पंप तलावातील पाण्याची पातळी ३१८ मीटरपर्यंत असताना पाणी खेचू शकतात. पण आता पातळी ३१४ मीटरपर्यंत आली आहे. पाणी खेचणाºया पंपाच्या हेडमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून ३११ मीटर पाण्याच्या पातळीपासून या पंपांनी पाणी खेचावे, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. नवेगाव खैरीत मात्र ३३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यायोग्य उपलब्ध असून, ते शहराला पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
आतापर्यंत दररोज मनपा ६४० दशलक्ष घनमीटर पाणी शहराला पुरवीत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी १५ दिवसात वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील चौराई जलाशयात ९४ दशलक्ष घनमीटर पाणी असून, आवश्यकता भासल्यास दोन्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन त्यातील १०-१५ दशलक्ष घनमीटर पाणी नागपूरसाठी घ्यावे लागणार आहे. ही सर्व वस्तुस्थिती शासनाला कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या असलेले पाणी फक्त पिण्यासाठी शिल्लक ठेवावे लागणार आहे.
पाण्याच्या योग्य वापरासाठी झोननुसार दक्षता समित्या
महानगरपालिकेने कमी पाणी वापरासाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याचा पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी वापर होऊ नये. उदाहरणार्थ बांधकाम, वाहने धुणे आदी यासाठी झोननुसार दक्षता समित्या गठित करण्यात येणार असून या समित्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणार आहेत. मनपाच्या पाणीपुरवठ्यापैकी ३० टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येणार आहे. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येणार आहेत. याशिवाय पाण्याची अजिबात गळती होणार नाही, यासाठी मनपाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महानिर्मितीच्या पाण्यातही कपात
महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना लागणाऱ्या पाण्यातही काही प्रमाणात कपात करण्यात येईल. कोराडीचे केंद्र सिवरेज ट्रीटमेंट प्लँटच्या पाण्यावरच सुरु आहे. फक्त पिण्यासाठीच महानगरपालिकेच्या पाण्याचा वापर केला जातो. कोराडीला २४.६९ तर खापरखेडाला २८ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. या दोन्ही केंद्रांची मागणी ५२ दलघमीची असताना त्यांना ४५ दलघमी पाणी मिळत आहे.
वेकोलिचे पाणी
वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या कोळसा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठे आहेत. १५ दिवसात हे पाणी वापरण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. हे पाणी आपल्या पाईपलाईनमध्ये कसे आणता येईल, तसेच नैसर्गिक स्रोतांमधील पाणी पाण्याच्या टाक्यांमध्ये कसे आणता येईल याचे नियोजन करून ते टाक्यांमध्ये आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरासाठी लघुनळ योजना करा, शहरात ६६० विहिरी आहेत. ५ हजार बोअरवेल्स आहेत. या सर्व जिवंत करा. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत राहून या बोअरवेल जिवंत करण्यास मदत करावी.
कळमेश्वर पाणीपुरवठा योजनेवरही या बैठकीत चर्चा झाली. शहरातील दूषित विहिरी आणि बोअरवेलच्या जवळ आर ओ प्लँट लावा. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे पाणी शुध्द आणि स्वच्छ पिण्यासाठ़ी उपलब्ध होईल. प्रत्येक झोनमध्ये ५-५ आरओ प्लँट लावण्याचे सूचित करण्यात आले. जिल्हा परिषदेने पाच हजार लोकवस्तीच्या गावात आर.ओ. प्लँट लावावे. जोपर्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.
रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक
महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महानिर्मिती व एनएमआरडीएने रेनवॉटर हार्वेस्टिग बंधनकारक करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. सर्व शासकीय इमारती, मनपा क्षेत्रातील घरे, मोठ्या इमारती, जिल्हा परिषदेने सर्व गावांमध्ये लोकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे. सर्व नगर परिषदांनी गावातील इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय इमारतींचे आराखडे मंजूर करू नयेत, असेही सूचित करण्यात आले.

 

 

Web Title: Alternate day water for four months : The water situation in Nagpur is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.