बुधवारपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 09:59 PM2021-01-05T21:59:27+5:302021-01-05T22:03:57+5:30
Alternate day water supply पेंचच्या मुख्य जलवाहीनीला अनेक ठिकाणांहून गळती लागल्यामुळे ही गळती दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामामुळे बुधवारी ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान, पेंच जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. यामुळे शहरातील ६५ टक्के भाग प्रभावित होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंचच्या मुख्य जलवाहीनीला अनेक ठिकाणांहून गळती लागल्यामुळे ही गळती दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामामुळे बुधवारी ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान, पेंच जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. यामुळे शहरातील ६५ टक्के भाग प्रभावित होणार आहे.
मुख्य जलकुंभावर मोठ्या गळत्या लागल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही, या दृष्टिकोनातून आताच ही कामे हाती घेण्यात आली आहेत. उपरोक्त कालावधीत जलसंपदा विभागाद्वारे नवेगाव खैरीच्या उजव्या कालव्यातून पाणी घेऊन महादुला स्थित पम्पिंग स्टेशन येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल. या कालावधीदरम्यान महादुला स्थित पम्पिंग स्टेशन येथून गोरेवाडा आणि गोधनी स्थित: जलशुद्धीकरण केंद्र येथेदेखील मर्यादित पाणीपुरवठा होणार असल्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित असलेले लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, मंगळवारी झोन, आसीनगर झोन, तसेच सतरंजीपुरा झोन या भागात या कालावधीत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, ज्या वस्त्यांमध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा होत आहे अशा भागातही दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय, कुठल्याही परिसरात टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही.
सम तारखानुसार दिवसाआड पाणीपुरवठा होणारे जलकुंभ
६ जानेवारी आणि ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० तारखेला होणारा पाणीपुरवठा
लक्ष्मीनगर झोन : खामला जलकुंभ, प्रतापनगर जलकुंभ, गायत्रीनगर जलकुंभ, लक्ष्मीनगर (जुना) जलकुंभ, त्रिमूर्तीनगर जलकुंभ , टाकळी सीम जलकुंभ, जयताळा जलकुंभ.
धरमपेठ झोन : दाभा जलकुंभ आणि टेकडी वाडी जलकुंभ, सेमिनरी हिल्स जलकुंभ, रामनगर जलकुंभ आणि फुटाळा जलवाहिनी.
हनुमाननगर झोन : कर्वेनगर जलकुंभ
गांधीबाग-महाल झोन : सीताबर्डी फोर्ट -१ जलकुंभ, सीताबर्डी फोर्ट -२ जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ.
मंगळवारी झोन : गिट्टीखदान जलकुंभ
७ जानेवारी आणि नंतर ९, ११, १३, १५,१७, १९, २१,२३, २५, २७, २९ तारखांना होणारा पाणीपुरवठा
लक्ष्मीनगर झोन : लक्ष्मीनगर (नवीन) जलकुंभ.
धरमपेठ झोन : गव्हर्नर हाऊस, सीताबर्डी जलकुंभ, धंतोली जलकुंभ.
हनुमाननगर झोन : ओमकारनगर (नवीन), ओमकारनगर (जुने) जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ , म्हाळगीनगर जलकुंभ, हुडकेश्वर नरसाला (ग्रामीण), नालंदानगर जलकुंभ
धंतोली झोन : रेशीमबाग जलकुंभ, हनुमाननगर जलकुंभ, वंजारीनगर १ , वंजारीनगर २ जलकुंभ
सतरंजीपुरा झोन : बोरियापुरा जलकुंभ, बोरियापुरा फिडर मेन, वाहन ठिकाण जलकुंभ.
आसीनगर झोन : नारी जलकुंभ, नारा जलकुंभ, जरीपटका जलकुंभ.
मंगळवारी झोन : गिट्टीखदान जलकुंभ (गोरेवाडा क्षेत्र), राजनगर जलकुंभ, सदर जलकुंभ.