विदर्भात कोरोना वाढत असला तरी मृत्यूदरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:59+5:302021-02-23T04:10:59+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा पुन्हा वाढत्या संसर्गामुळे विदर्भातील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषत: अमरावती, नागपूर, अकोला, बुलडाणा, ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा पुन्हा वाढत्या संसर्गामुळे विदर्भातील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषत: अमरावती, नागपूर, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा जिल्हात कोरोनाग्रस्तांची संख्या अगदी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विदर्भ पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर आला आहे. असे असताना, मागील २० दिवसात बाधितांच्या मृत्यूदरात घट आली आहे. १ फेब्रुवारी रोजी २.५४ टक्के असलेला मृत्यूदर २० फेब्रुवारी रोजी २.४३ टक्क्यावर आला आहे.
विदर्भात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात दैनंदिन रुग्णसंख्या ७७६ च्या पुढे गेली नव्हती. परंतु १० फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यात ३९१ तर अमरावती जिल्ह्यात ३५९ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे विदर्भातील रुग्णसंख्या १०१४ वर गेली. त्यानंतर ती वाढतच गेली. विदर्भात मागील २१ दिवसात २२,६८१ नवे रुग्ण आढळून आले. यातील पहिल्या नऊ दिवसात ५,७८९ तर नंतरच्या ११ दिवसात १६,८९२ रुग्णसंख्या झाली. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात बाधितांची संख्या अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागात नागपूरसह वर्धा तर अमरावती विभागात अमरावतीसह अकोला, यवतमाळ, बुलडाणा या चार जिल्ह्यात रुग्णसंख्येने वेग पकडला आहे.
- विदर्भात ७,२०५ रुग्णांचा मृत्यू
विदर्भात पहिल्या मृत्यूची नोंद १ मार्च रोजी झाली. त्यानंतर मृत्यूची संख्या वाढत गेली. एप्रिल महिन्यात ११, मे महिन्यात ५५, जून महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ ऑगस्ट महिन्यात १२०२, सप्टेंबर महिन्यात २,४२८, ऑक्टोबर महिन्यात १४९२, नोव्हेंबर महिन्यात ५३५, डिसेंबर महिन्यात ५१६, जानेवारी महिन्यात ४०९ तर २० फेब्रुवारी २३७ असे एकूण ७,२०५ मृत्यू झाले आहेत.
- २.५४ टक्क्याहून २.४६ टक्क्यावर आला मृत्यूदर
विदर्भात २० फेब्रुवारीपर्यंत २३५ रुग्णांचा मृत्यू झाला. १ ते १० फेब्रुवारीपर्यंत मृत्यूदर २.५४ टक्के ते २.५२ टक्के दरम्यान होता. ११ फेब्रुवारीपासून मृत्यूची संख्या वाढत गेली. परंतु रुग्णांची संख्याही वाढल्याने मृत्यूचा दर कमी झाला. ११ ते २० फेब्रुवारीपर्यंत मृत्यूदर २.५१ टक्के ते २.४३ टक्क्यावर आला.
- असा आहे मृत्यूदर
१ फेब्रुवारी २.५४ टक्के
४ फेब्रुवारी २.५४ टक्के
६ फेब्रुवारी २.५३ टक्के
८ फेब्रुवारी २.५२ टक्के
१० फेब्रुवारी २.५२ टक्के
१२ फेब्रुवारी २.५१ टक्के
१४ फेब्रुवारी २.४९ टक्के
१६ फेब्रुवारी २.४७ टक्के
१८ फेब्रुवारी २.४५ टक्के
२० फेब्रुवारी २.४३ टक्के
- विदर्भातील मृत्यूची संख्या
महिना मृत्यूसंख्या
मार्च१
एप्रिल ११
मे ५५
जून ९१
जुलै २२९
ऑगस्ट १२०२
सप्टेंबर २४२८
ऑक्टोबर १४९२
नोव्हेंबर ५३५
डिसेंबर ५१६
जानेवारी ४०९
फेब्रुवारी २३७ (२० पर्यंत)