कोरोनामुक्तीचा ग्राफ वाढत असला तरी ॲम्ब्युलन्सवर वेटिंगचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:36+5:302021-05-05T04:13:36+5:30

- अनेक रुग्णवाहिकांची दिवसाला २२ तास धावाधाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा ...

Although the graph of coronation is increasing, the stress of waiting on the ambulance | कोरोनामुक्तीचा ग्राफ वाढत असला तरी ॲम्ब्युलन्सवर वेटिंगचा ताण

कोरोनामुक्तीचा ग्राफ वाढत असला तरी ॲम्ब्युलन्सवर वेटिंगचा ताण

Next

- अनेक रुग्णवाहिकांची दिवसाला २२ तास धावाधाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अद्यापही ओसरला नसला तरी कोरोनामुक्त रुग्णांचा ग्राफ वाढत आहे. निश्चितच ही अंधारात चाचपडत असलेल्या नागरिकांसाठी आशेची प्रकाशवाट आहे. मात्र, रुग्णांना रुग्णालयात दाखल करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवरचा ताण जराही कमी झालेला नाही. शहरातील सर्व रुग्णवाहिका प्रचंड व्यस्त आहेत. घरून हॉस्पिटल शोधणे, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे, संबंधित प्रक्रिया पार पडेस्तोवर थांबून राहणे आणि पुन्हा दुसऱ्या रुग्णासाठी निघणे... अशी स्थिती सुरू आहे. अशा स्थितीत अनेक रुग्णांना वेटिंगवर राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेकांचा जीव घरीच तर कधी रस्त्यातच ॲम्ब्युलन्समध्ये जात आहे. जीवनाची ही मरणयातना बघत पुन्हा कर्तव्यदक्ष होण्याची जबाबदारी मात्र रुग्णवाहिका चालक अहोरात्र पार पाडत आहेत.

मनपाच्या संकेतस्थळावर असलेल्या सद्यस्थितीतील माहितीनुसार शहरात आजघडीला १६४ रुग्णालयांमध्ये कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. शिवाय, दररोज कोविड केअर सेंटर्सची नव्याने भर पडत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात या एकाही रुग्णालयात एकही बेड कधीच रिकामा झाल्याचे दिसत नव्हते, त्या रुग्णालयात रुग्णांसाठी आता खाटा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या तणावात थोडी का होईना घसरण हाेत आहे. मात्र, संक्रमितातील अत्यवस्थ रुग्णांचा प्रवास अजूनही सोपा झालेला नाही. त्याचा ताण रुग्णवाहिका चालकांवर होताना दिसतो. शासकीय व खासगी हॉस्पिटल्सची स्वत:ची रुग्णवाहिका यंत्रणा आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका हॉस्पिटल्सच्याच कॉलवर जात असतात. मात्र, खासगी रुग्णवाहिका चालक व स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकांवरील ताण प्रचंड वाढला आहे. या चालकांना एकाच वेळी सरासरी चार रुग्णांचे कॉल अटेंड करावे लागत आहे. एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचविल्यावर तिथे वेळ लागला तर दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहोचणे अवघड होत असल्याचेही चित्र आहे. अशा स्थितीत चालकांना रुग्णांच्या मृतदेहाचाही सामना करण्याचे शल्य भोगावे लागत आहे.

------------------

खासगी रुग्णवाहिकांचे व्यावसायिक धोरण

खासगी रुग्णवाहिका पूर्णत: व्यावसायिक धोरण अवलंबित आहेत आणि या काळात तर पैसा जास्त कमावण्यावरच त्यांचा भर आहे. एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर, हे खासगी रुग्णवाहिका चालक एका हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे सहा हजार रुपये चार्ज करीत आहेत. मंगळवारीच एका रुग्णाला हॉस्पिटल मिळाले नाही. त्यामुळे, त्याला पाच हॉस्पिटल फिरावे लागले. त्या रुग्णाकडून रुग्णवाहिका चालकाने प्रत्येकी ६ असे ३० हजार रुपये वसूल केल्याचे सांगितले जात आहे.

----------

स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकांना उसंतच नाही

शहरात स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकाही आहेत. कोरोना काळात या रुग्णवाहिका पूर्णत: समाजसेवेसाठी वाहिलेल्या दिसून येत आहेत. अनेक गरीब रुग्णांना यांचा आधार होत आहे. मात्र, रुग्णांचा वाढता ओघ बघता अनेकांना वेटिंगवर राहावे लागते. दिवसाचे २२ तास या रुग्णवाहिकांची चाके फिरत आहेत. महापालिकेने आपली बसचे रूपांतरण रुग्णवाहिकेत केले आहे. त्यामुळे काहीअंशी हा भार कमी होण्याची शक्यता आहे.

----------.

स्पेशल रुग्णांना प्राधान्य, अनोळखींसाठी ठेवले जाते ताटकळत

- राजकीय नेते, संघटनांकडून फोन येणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे बरेचदा दुसऱ्या रुग्णांना ताटकळत ठेवले जाते. याचा फटका सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिका चालकांना बसतो. त्यामुळे दुसऱ्या वेटिंगवर असलेल्या रुग्णापर्यंत वेळेत पोहोचणे कठीण होत असल्याच्या तक्रारीही पुढे यायला लागल्या आहेत.

---------------

पॉईंटर्स

शहरात कोविड हॉस्पिटल्सची संख्या व बेड्स

कोविडचे उपचार सुरू असणारे हॉस्पिटल्स - १६४

ऑक्सिजन बेड्स - ४,७६१

नॉन ऑक्सिजन बेड्स - २८९

आयसीयू बेड्स - २,२६६

व्हेंटिलेटर्स - ५६१

संदर्भ - एनएसएससीडीसीएल.ओआरजी/कोविडबेड्स (नागपूर स्मार्ट सिटी)

----------------

पॉईंटर्स

शहरात रुग्णवाहिका (शासकीय, निमशासकीय, खासगी हॉस्पिटल्स व अन्य)

सुदृढ स्थितीत - ३१४

कमजोर स्थितीत - १७४

एकूण - ४८८

-------------

जिल्हा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व हॉस्पिटल्स येथील रुग्णवाहिका

ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट - ९

बेसिक लाईफ सपोर्ट - ३१

एकूण - ४०

-------

कुणी मरतो, कुणी वाचतो, हेच सध्या बघतो आहे.

फेब्रुवारीपासून फोनची रिंग सतत वाजते आहे. दिवसाचे २२ तास गाडी चालत आहे. अनेकदा रुग्ण रुग्णवाहिकेतच दगावतो, हे बघावे लागत आहे. एका शासकीय रुग्णालयात एका रुग्णाला नेले असता, डॉक्टर घ्यायलाच तयार नव्हते. अखेर गाडीतच रुग्ण दगावला. त्यानंतर डॉक्टर आले तर आता बघून काय उपयोग असे म्हणालो तर डॉक्टर आणि सुरक्षा रक्षक मारायला धावले आणि मारण्याची धमकी द्यायला लागले. अशा तऱ्हेने दररोज सात-आठ रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये नि:शुल्क पोहोचवितो आहे आणि तेवढेच रुग्ण वेळेत पोहोचू शकत नसल्याने वाट बघत असतात.

- मंगेश बढे, रुग्णवाहिका चालक, जनमंच

....................

Web Title: Although the graph of coronation is increasing, the stress of waiting on the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.