मिळाला व्हरांडा जरी, सुखरूप आलो घरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:13+5:302021-05-12T04:09:13+5:30
एचआरसीटी स्कोर २३ आणि ऑक्सिजन लेवल ६० अभय लांजेवार उमरेड : तब्बल दोन आठवडे रक्तचाचणी केली नाही. सीटी स्कॅनही ...
एचआरसीटी स्कोर २३ आणि ऑक्सिजन लेवल ६०
अभय लांजेवार
उमरेड : तब्बल दोन आठवडे रक्तचाचणी केली नाही. सीटी स्कॅनही झाले नाही. खासगी डॉक्टरांचा औषधोपचार घेतला. तब्येत बिघडली. उमरेडच्या एका हॉस्पिटलमधील डॉक्टरचा सल्ला घेतला. त्यांनीही ‘रुग्णाचे कठीण आहे’ असे म्हणत धडकी भरविली. तिकडूनच नागपूर मेडिकलला रवाना केले गेले. तिथे सुद्धा बेड नाही. दोन दिवस व्हरांड्यात काढले. त्यानंतर बेड मिळाला. प्रकृतीत सुधारणा झाली.
रवींद्र रामकृष्ण गिरसावळे (५३, रा. ग्रीन सीटी, उमरेड) असे या जिगरबाज रुग्णाचे नाव आहे. ते सोमवारी (दि. १०) घरी पोहोचले. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट घेतली असता ‘मिळाला व्हरांडा जरी, सुखरूप आलो घरी’ अशा त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या.
गिरसावळे यांची परिस्थिती अतिशय बेताचीच! पानविड्याचे दुकान होते, तेही बंद पडले. कालांतराने पत्रावळी विक्रीचे छोटेसे दुकान सुरू केले. २८ मार्चला त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. तब्बल १५ दिवस घरी औषधे घेतली. अखेरीस १२ एप्रिलला प्रकृती बिघडली. नागपूर मेडिकलला पोहोचल्यानंतर एकही बेड शिल्लक नव्हता. तब्बल दोन दिवस व्हरांड्यात स्ट्रेचरवर ऑक्सिजन लावून अतिशय कठीण अवस्थेत काढले. त्यावेळी एचआरसीटी स्कोर होता २३ आणि ऑक्सिजन लेवल होती ६०. अशाही अवस्थेत ते डगमगले नाहीत. हार मानायची नाही, जीवन-मरणाच्या या लढाईत कोणत्याही परिस्थितीत मृत्यूला पराभूत करायचेच, अशी खूणगाठ त्यांनी बांधली. त्यांच्या हिमतीला मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह पत्नी रंजना आणि जावई निखिल डाखळे यांची साथ लाभली. यादरम्यान नगरसेवक सतीश चौधरी, रोहित पारवे, कैलास ठाकरे यांनी मदतीचा हात दिला. मेडिकलच्या ट्रामा कोविड सेंटरमधील वॉर्ड क्रमांक २० मध्ये व्यवस्था झाली. तब्बल १५ दिवस व्हेंटिलेटरवर काळजीतच गेले. डॉक्टर, परिचारिका यांनी रवींद्र यांना या संकटातून बाहेर काढले.
सेवेकरी झाले रवींद्र
तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी प्रकृती, चिंता यातच गेला. नागपूर मेडिकलला ज्या वॉर्डात रवींद्र गिरसावळे भरती होते, त्या वॉर्डातील अन्य रुग्णांसाठी ते सेवेकरी बनले. अन्य रुग्णांना मास्क लावून देणे, त्यांना जेवण भरविणे, फळ देणे सोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम रवींद्र यांनी केले. आता त्यांची ऑक्सिजन लेवल ९३-९४ असून मला त्या रुग्णांची सेवा करताना खूप समाधान मिळाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.