खरीप हंगाम तोंडावर आला तरी धान विक्रीची रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:34+5:302021-05-06T04:08:34+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यात शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर जानेवारी महिन्यात धान विकला; पण काही शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत ...
रामटेक : रामटेक तालुक्यात शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर जानेवारी महिन्यात धान विकला; पण काही शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत चुकारे त्यांच्या खात्यात जमा केले नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारबोडी येथे आदिवासी विकास महामंडळाचे गोडावून आहे, तरी धान खरेदी केंद्र बेरडेपार या जंगलव्याप्त गावात देण्यात आले. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ते महादुला येथे देण्यात आले. डिसेंबरमध्ये धान खरेदी सुरू झाली. कधी बारदाना नाही तर कधी उचल झाली नाही म्हणून धान खरेदी संथगतीने झाली. सुरुवातीला धानाचे काही शेतकऱ्यांना चुकारेही मिळाले. जानेवारीमध्ये काही शेतकऱ्यांचे धान खरेदी केले; पण अजूनपर्यंत चुकारे जमा झाले नाहीत. महादुला येथील रामू कारु डडुरे यांनी ३२ क्लिंटल धान आदिवासी महामंडळाचे धान खरेदी केंद्रावर विकले. त्यांचे ५९,७७६ रुपये अद्यापही जमा झाले नाहीत. बाबूराव चिंधुजी डडुरे यांचे २४.४० क्लिंटल धान विकले गेले. त्यांचे ४५,५७९ रुपये मिळाले नाहीत. अर्जुन तुकाराम काठोके यांनी ४५.६० क्लिंटल धान विकला. त्यांचे ८५,१८० रु. बाकी आहे. इतर शेतकऱ्यांची अवस्था अशीच आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली; पण फक्त पैसे लवकर जमा होतील, असे सांगून वेळ मारून नेला जात आहे. उन्हाळ्याचा आता शेवटचा महिना सुरू आहे. यंदा पाऊस वेळेवर येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीला लागणारे बियाणे, खते व इतर साहित्य शेतकरी खरेदी करीत असतात. त्याचबरोबर शेतीचे घेतलेले कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. मात्र जुनेच कर्ज जर फेडले नाही तर नवीन कर्ज कसे मिळणार, हाही एक प्रश्न आहे.