घरावर अधिकार असला तरी बळजबरीने ताबा घेणे अवैध
By admin | Published: February 28, 2016 03:19 AM2016-02-28T03:19:23+5:302016-02-28T03:19:23+5:30
एखाद्याचा वडिलोपार्जित घरावर अधिकार असला तरी, त्या घराचा बळजबरीने ताबा घेणे अवैध आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
हायकोर्टाचा निर्वाळा : नुकसान भरपाई देण्याचे निर्देश
नागपूर : एखाद्याचा वडिलोपार्जित घरावर अधिकार असला तरी, त्या घराचा बळजबरीने ताबा घेणे अवैध आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच, घराचा बळजबरीने ताबा घेणाऱ्या दाम्पत्याने याचिकाकर्त्यास ५०० रुपये प्रति दिवसप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत.
महेश घोटेकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. उर्विला कॉलनी येथे त्यांचे सहा खोल्यांचे वडिलोपार्जित घर आहे. आई-वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर तीन खोल्यांमध्ये त्यांचे मोठे भाऊ व वहिनी राहात होत्या. २००७ मध्ये भावाचा मृत्यू झाला व वहिनी बहिणीकडे रहायला गेल्या. यामुळे या तीन खोल्या २००६ ते २००८ पर्यंत याचिकाकर्त्याच्या ताब्यात होत्या. बेसा येथे घर घेतल्यानंतर त्यांनी या खोल्या एका डॉक्टरला भाड्याने दिल्या. ३१ आॅगस्ट २०११ रोजी डॉक्टरने खोल्या खाली केल्या. यानंतर याचिकाकर्त्याच्या दिवंगत मोठ्या भावाच्या मुलीने १ नोव्हेंबर २०११ पासून या खोल्यांचा ताबा घेतला. परिणामी याचिकाकर्त्याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. हा दावा खारीज करण्यात आला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी सिंबंधित दाम्पत्याने घराचा ताबा याचिकाकर्त्यास द्यावा. े घर खाली करण्यापासून ते दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या तारखेपर्यंत ५०० रुपये दिवसाप्रमाणे याचिकाकर्त्यास नुकसान भरपाई द्यावी असे सांगितले. संबंधित दाम्पत्याला पुढील सहा आठवड्यापर्यंत घरात राहू द्यावे. यानंतर याचिकाकर्त्याला घराचा ताबा मिळविता येईल असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एस. ए. काळबांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)