एकूण निकाल घटला तरी ४७ टक्के विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 08:00 AM2023-06-02T08:00:00+5:302023-06-02T21:10:01+5:30
Nagpur News मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नागपूर विभागाची टक्केवारी पाच टक्क्यांनी घटली असली तरी १०० टक्के निकाल देणाऱ्या विषयांचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
योगेश पांडे
नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नागपूर विभागाची टक्केवारी पाच टक्क्यांनी घटली असली तरी १०० टक्के निकाल देणाऱ्या विषयांचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील वर्षी ३२.५ टक्के विषयांचा निकाल १०० टक्के लागला होता. यंदा ‘सेंट परसेंट’ निकाल देणाऱ्या विषयांची टक्केवारी ४७ टक्क्यांहून अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे हे विशेष.
दहावीला विद्यार्थ्यांना ४० विषयांचा विकल्प असतो. मागील वर्षी १३ विषयांत पूर्ण निकाल लागला होता. यंदा हा आकडा १९वर पोहोचला आहे. एरवी विद्यार्थ्यांना दहावीत गणित, इंग्रजी हे विषय ‘किलर’ वाटत असतात. गणिताची टक्केवारी मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी घटली असली तरी ९५.०५ टक्के या विषयात उत्तीर्ण झाले. इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.०३ टक्के आहे. मात्र इंग्रजी (द्वितीय भाषा) विषयाचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेतच चार टक्क्यांनी घटला व यंदा ९३.०१ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले.
हिंदी विषयाचा निकालदेखील खालावल्याचे दिसून आले. हिंदी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९०.०३ टक्के लागला तर हिंदी (द्वितीय व तृतीय भाषा) विषयाचा निकाल ९३.०२ टक्के लागला. २०२२ मध्ये हीच टक्केवारी अनुक्रमे ९७.७२ आणि ९७.३३ टक्के इतकी होती.
संस्कृतचा निकालदेखील मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षी ९९.८० टक्के निकाल लागला होता व यंदा हा आकडा ९८.७० टक्के इतकाच आहे.
मराठीचा निकाल पाच टक्क्यांनी घटला
मागील वर्षी मराठीचा (प्रथम भाषा) निकाल ९७.३४ टक्के लागला होता. यंदा मराठीचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे. मराठी (द्वितीय-तृतीय भाषा)चा निकालदेखील चार टक्क्यांनी घटला असून यंदा ९५.७३ टक्केच निकाल लागला.
गणित-विज्ञानाच्या टक्केवारीतदेखील घटच
हिंदी, मराठीप्रमाणे यंदा गणित व विज्ञान या विषयांच्या उत्तीर्णांच्या टक्केवारीतदेखील घट झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९५.३५ टक्के तर गणितात ९५.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सामाजिक विज्ञान विषयात ९६.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
९ विषयांत शंभरहून कमी परीक्षार्थी
सर्वात जास्त १ लाख ५० हजार ७७१ विद्यार्थी गणिताच्या परीक्षेला बसले. तर त्याखालोखाल १ लाख ५० हजार ५१८ विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाची परीक्षा दिली. हिंदी-तामिळ (द्वितीय भाषा) विषयाला अवघे तीनच परीक्षार्थी होते व ते सर्व उत्तीर्ण झाले. ९ विषयांमध्ये १०० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते.
१०० टक्के निकाल लागलेले विषय
- तेलगू (प्रथम भाषा), बंगाली (प्रथम भाषा), पाली (द्वितीय-तृतीय भाषा), पॉवर कन्झ्युमर एनर्जी मीटर, फिजिऑलॉजी हायजिन ॲंड होमसायन्स, फिजिकल ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेटर, मराठी-बंगाली (द्वितीय / तृतीय), हिंदी-उर्दू (द्वितीय / तृतीय), हिंदी-सिंधी (द्वितीय / तृतीय) , हिंदी-तामिल (द्वितीय / तृतीय) , हिंदी-गुजराती (द्वितीय / तृतीय), सेल्फ डेव्हलपमेंट, वॉटर सिक्युरिटी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निक, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, टुरिझम ॲन्ड हॉस्पिटॅलिटी, कृषी, इलेक्ट्रॉनिक ॲंड हार्डवेअर, हेल्थकेअर,