अमानुष मनुस्मृतीवर बंदी हवीच!
By Admin | Published: March 10, 2016 03:30 AM2016-03-10T03:30:37+5:302016-03-10T03:30:37+5:30
महाराष्ट्रात बंदी असलेल्या मनुस्मृतीचे मराठी भाषांतर विष्णुशास्त्री बापट यांनी केले असून पुणे येथील राजेश प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केले आहे.
धंतोली पोलिसात तक्रार : लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांवर कारवाई करा
नागपूर : महाराष्ट्रात बंदी असलेल्या मनुस्मृतीचे मराठी भाषांतर विष्णुशास्त्री बापट यांनी केले असून पुणे येथील राजेश प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. माणूसपण नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे समर्थन कदापि होऊच शकत नाही. अमानुष मनुस्मृतीवर बंदी हवीच, अशी मागणी नागपुरातील विविध सामाजिक संघटनांनी केली असून त्यासाठी आंदोलनाची तयारी चालविली आहे. तसेच, मनुस्मृतीचे मराठी भाषांतर करणाऱ्या लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी तक्रार तेली समाज महासंघातर्फे धंतोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक पुस्तकालयात ते उपलब्ध आहे. यावर लोकमतने ९ मार्च रोजीच्या अंकात विशेष वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. हे वृत्त प्रकाशित होताच सर्वत्रच याचा निषेध व्यक्त केला जात आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले असून अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तेली समाज बांधव व तेली समाज महासंघ यांच्यावतीने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने लिहिलेल्या या तक्रार अर्जात म्हटले आहे, ‘संपूर्ण मराठी भाषांतर सार्थ श्री मनुस्मृती वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट’ या पुस्तकामध्ये तेली समाजाबद्दल व इतरही जातींबद्दल विकृत लिखाण करणारे लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. शिष्टमंडळात तेली समाज महसंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश पिसे, सचिव डॉ. राजेंद्र पडोळे, कार्याध्यक्ष विलास काळे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक माने यांनी हे प्रकाशन पुणे येथील असल्याने यासंबंधीचा अर्ज पुणे शहर पोलिसांकडे पाठविला. (प्रतिनिधी)
कलार समाज करणार मनुस्मृतीचे दहन
मनुस्मृती पुस्तकाच्या विक्रीवर शासनाने तातडीने बंदी आणावी. तसेच दोषींवर कारवाई करावी, अन्यथा कलार, कलाल समाज राज्यभर आंदोलन करून मनुस्मृतीचे दहन करेल, असा इशारा अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे यांनी दिला आहे. मनुस्मृती पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असतांनाही नव्या रूपात या पुस्तकाचे प्रकाशन करणे व त्यात कलाल, कलार जातीला हीन दर्जाची तसेच महिलांचा अपमान करून महिलांना कमी लेखणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे मराठी रुपांतर हेतूपुरस्सरपणे करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे भाषांतरकार, प्रकाशक व मुख्य वितरकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी भूषण दडवे यांच्यासह कलार समाजाचे कार्याध्यक्ष प्रा. राजाभाऊ दुरुगकर, महासचिव रमेश कोलते, नारायण टाले, अॅड. सूर्यकांत जायस्वाल, डॉ. बी.आर. काकपुरे, फाल्गुन उके, विजय हरडे, विजय चौरागडे, किशोर शिवहरे, खेमचंद राय, रमेश जायस्वाल, दामोधर दियेवार, मोहन सोनवणे, ओंकार सूर्यवंशी आदींनी केली आहे.