गुरू-शुक्राची आज विलोभनीय युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 08:00 AM2023-03-01T08:00:00+5:302023-03-01T08:00:07+5:30
Nagpur News १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे.
नागपूर : आज १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे.
रमण विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले, सध्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत आहेत. १ ते ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मीळ संधी आहे. ही युती भासमान युती आहे. जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वीपासून त्यांचे अंतर खूप जास्त आहे. शुक्र पृथ्वीपासून २०,५६,३१,१४१ कोटी कि.मी. तर गुरू ८६,१८,४३,१९२ कोटी किमी अंतरावर असतील. १ मार्चला दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल. यादरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरूची तेजस्विता -२.० असेल. ३, ४, ५ मार्चपर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्या कमी अंतरावर असतील. पुढे गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल.
रमण विज्ञान केंद्रात निरीक्षणाची संधी
रमण विज्ञान केंद्र व तारा मंडळाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत अवकाश निरीक्षण उपक्रम आयाेजित केला आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजता शक्तिशाली टेलिस्काेपद्वारे गुरू आणि शुक्र ग्रहाची युती पाहण्याची संधी अवकाशप्रेमी व विद्यार्थ्यांना आहे.