अद््भूत गौरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:31 AM2017-09-04T01:31:03+5:302017-09-04T01:31:36+5:30
गायक सुनील वाघमारे, मेहंदीकार सुनीता धोटे व शेफ विष्णू मनोहर यांच्यानंतर आणखी एका नागपूरकर व्यक्तीच्या नावे विश्वविक्रम नोंदविला गेला.
जागतिक विक्रमाला गवसणी
कमी वेळात सर्वाधिक वस्तूंचा क्रम जोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गायक सुनील वाघमारे, मेहंदीकार सुनीता धोटे व शेफ विष्णू मनोहर यांच्यानंतर आणखी एका नागपूरकर व्यक्तीच्या नावे विश्वविक्रम नोंदविला गेला. अवघ्या १२ वर्षाच्या गौरी कोढे या नागपूरकन्येने एका मिनिटात सर्वाधिक वस्तूंचा क्रम लक्षात ठेवून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाची नोंद केली. रविवारी प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात गौरीने अद््भूत स्मरणशक्तीच्या जोरावर एका मिनिटाच्या अवलोकनात ५० वस्तूंचा क्रम तंतोतंत जोडून संत्रानगरीच्या शिरपेचात पुन्हा एका विक्रमाचा तुरा रोवला.
साई सभागृह येथे दुपारी ४ वाजता विक्रम नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सभागृहातील प्रेक्षकांनी जवळची एक एक वस्तू परीक्षकाजवळ दिली व त्यांनी एका चार्टवरील वेगवेगळ्या क्रमांकावर त्या वस्तू ठेवल्या. या काळात ही क्रमवारी गौरीला दिसणार नाही अशा पद्धतीने सभागृहाकडे पाठ करून बसविण्यात आली. त्यानंतर स्टॉपवॉचच्या मदतीने क्रमावर लावलेल्या वस्तूंचे अवलोकन करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला. त्यानंतर सर्व वस्तू क्रमावरून हटविण्यात आल्या. गौरीला १५ मिनिटात या सर्व वस्तू पूर्वीच्या क्रमात लावायच्या होत्या.
काय आहे आधीचा विक्रम
याआधी २०१५ साली नेपाळच्या अर्पण शर्मा या २७ वर्षांच्या तरुणाने एका मिनिटाच्या पाठांतरात ४२ वस्तू ओळखण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. गौरीने त्यापेक्षा कमी वेळात हा विक्रम मोडून नवा विक्रम स्थापन केला. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे कमी वयात हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव व्यक्ती ठरली आहे.