आश्चर्यकारक : नागपुरात स्फटिकांची दुनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:13 AM2018-12-13T00:13:54+5:302018-12-13T00:15:17+5:30
पृथ्वीच्या भूगर्भात दडलेला स्फटिक असा एक खनिज पदार्थ आहे, ज्यापासून रत्नांची निर्मिती होते, ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया रमण विज्ञान केंद्रात आयोजित फिरत्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. यात स्फटिकांचे सौंदर्य, त्यावरील संशोधने, भौतिक व रासायनिक गुणधर्म, इतिहासातील दाखले देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पृथ्वीच्या भूगर्भात दडलेला स्फटिक असा एक खनिज पदार्थ आहे, ज्यापासून रत्नांची निर्मिती होते, ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया रमण विज्ञान केंद्रात आयोजित फिरत्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. यात स्फटिकांचे सौंदर्य, त्यावरील संशोधने, भौतिक व रासायनिक गुणधर्म, इतिहासातील दाखले देण्यात आले आहे.
स्फटिक एक दगडसदृश पदार्थ आहे. पण हा पदार्थ किती बहुमूल्य आहे, याची प्रचिती रमण विज्ञान केंद्रात आयोजित स्फटिकाची आश्चर्यकारक दुनिया या प्रदर्शनातून येते. स्फटिकाचे आरोग्यवर्धक गुणधर्म आहे. पण स्फटिक वेगवेगळ्या क्षेत्रात कसा उपयुक्त आहे याची माहिती प्रदर्शनातून मिळते. वेगवेगळ्या आकारातील आणि रंगातील स्फटिक या प्रदर्शनात बघायला मिळतात. दहाव्या शतकातील गरुडपुराण व १३ व्या शतकातील रसरत्नसमुच्चय या ग्रंथांमध्ये स्फटिकाचे गुणधर्म दिलेले आहे. १९१३ मध्ये स्फटिकांची रचना शोधण्यासाठी विलियम हेन्री ब्रॅग व विलियम लॉरेन्स ब्रॅग यांनी तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यासंदर्भात झालेली संशोधने याची विस्तृत माहिती यात आहे. स्फटिकांच्या आकाराचे कन्स्ट्रक्शन, हिरे कसे चमकतात, स्फटिकापासून रत्न कसे तयार होतात याची माहिती प्रदर्शनातून मिळते.
युनेस्कोने २०१४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिस्टेलोग्राफी वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाने स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया हे प्रदर्शन बनविले आहे. रमण विज्ञान केंद्रात १२ जानेवारी ते २७ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन बघता येणार आहे.
कोहिनूर १०५.६ कॅरेट
कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे. जो १०५.६ कॅरेटचा आहे. ज्याचे वजन २१.६ ग्रॅम आहे. या कोहिनूरचा इतिहास व विस्तृत माहिती प्रदर्शनात दिली आहे.
स्फटिकाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, त्याचा इतिहास, ते कसे तयार होतात. त्यांची आकृती, रचना कशी असते, याची संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्रदर्शनातून मिळते. संशोधनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे प्रदर्शन आहे.
एन. रामदास अय्यर, प्रकल्प समन्वयक, रमण विज्ञान केंद्र