चायना पिकवितोय नागपुरातील आंबे
By admin | Published: April 24, 2017 01:28 AM2017-04-24T01:28:52+5:302017-04-24T01:28:52+5:30
फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसह आता चीनच्या ‘इथेलिन रायपनर’ (अनसॉल्टेड पावडर) या आरोग्याला घातक आणि अतिविषारी रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
अतिविषारी ‘इथेलिन रायपनर’ रसायनाचा उपयोग : सहा तासातच आंबे पिकतात
मोरेश्वर मानापुरे नागपूर
फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसह आता चीनच्या ‘इथेलिन रायपनर’ (अनसॉल्टेड पावडर) या आरोग्याला घातक आणि अतिविषारी रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पांढऱ्या टी-बॅगमधील (पाऊच) या रसायनाने कच्ची फळे केवळ सहा तासातच पिकतात आणि विक्रीसाठी तयार होतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कळमना फळे बाजारात सर्रास सुरू आहे.
रसायनाचा कोट्यवधींचा व्यवसाय
चीनच्या ‘इथेलिन रायपनर’ रसायनाचा व्यवसाय ९८ टक्के बाजारपेठांमध्ये सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या रसायनाची भारतात बिनदिक्कत विक्री सुरू आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. या व्यवसायात अन्न आणि औषध विभाग आणि वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी लिप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हजारो टन रसायनयुक्त आंब्याची विक्री
कळमन्यात हजारो क्विंटल आंब्याची आवक होत आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे. किरकोळ बाजारात आंध्र प्रदेशातील बैंगनफल्ली आंब्याची सर्वाधिक विक्री होते. दररोज हजारो क्विंटल पिकविलेल्या आंब्याच्या विक्रीतून व्यापारी मालामाल होत आहे. त्या बदल्यात व्यापारी ग्राहकांना आंबारूपी विष देत आहे. व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई शून्य
यंदाच्या उन्हाळ्यात दररोज लाखो रुपयांच्या आंब्याची उलाढाल सुरू आहे. आंबे कृत्रिमरीत्या पिकविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना आहे. पण आर्थिक व्यवहारामुळे अधिकाऱ्यांनी एकाही आंबे विक्रेत्यांवर कारवाई केलेली नाही. तीन दिवसांपूर्वी चीनच्या इथेलिन रायपनर पावडरने पिकविलेले ८३९ क्विंटल आंबे अधिकाऱ्यांनी जप्त करून नष्ट केल्याचे वृत्त आहे. आंबा विषारी झाला आहे. कारवाईसाठी अधिकारी कुणाची वाट पाहात आहे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सदर प्रतिनिधीने कळमना फळ बाजाराची पाहणी केली असता सर्वच दुकानांमध्ये हजारो कच्च्या आंब्याच्या पेटीत या विषारी रसायनाच्या पांढऱ्या टी-बॅग दिसून आल्या या पाऊचवर शेनडाँग अवोएट बायोटेक्नॉलॉजी कं.लि., शेनकाँग, चायना असे लिहिले आहे. या शिवाय ‘फ्रेश फ्रूट रिपेनिंग’सह मुलांना यापासून दूर ठेवण्याची नोंद आहे. हे पाऊच व्यापाऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत आहे. आंबे पिकविण्यासाठी या पावडरचे पाऊच पाण्यात भिजवून कच्च्या फळांच्या पेटीत ठेवण्यात येते. या पाऊचमधून निघणाऱ्या इथेलिन गॅसमुळे आंबे पाच ते सहा तासातच पिकतात आणि पिवळे गडद होतात. पिवळ्या रंगाच्या आंब्याला जास्त भाव आणि बाजारात मागणी असल्यामुळे व्यापारीसुद्धा या पावडरचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहेत. अन्न व औषध विभागाचे अधिकारी या भ्रष्टाचाराकडे चक्क कानाडोळा करीत असल्यामुळे कृत्रितरीत्या आंबे पिकविण्याचा उद्योग दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा विषारी प्रक्रियेवर प्रतिबंध आणण्याची मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.
‘इथेलिन रायपनर’ आरोग्याला घातक
कॅल्शियम काबाईड आणि इथेलिन रायपनर पावडरचा उपयोग करून कृत्रिमरीत्या पिकविलेले विषारी आंबे आरोग्याला घातक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या आंब्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गडद पिवळ्या रंगाच्या आंब्याचे सेवन लहानांपासून वयस्कांपर्यंत करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. अन्नधान्याप्रमाणे फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे.
कॅल्शियम कार्बाइडवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. विषारी आंब्यावर विभाग कारवाई केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय ‘एमआयगु्रप आॅन-३९’ या ‘प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर’ असे नमूद असलेल्या आणि झाडांना देण्यात येणाऱ्या रसायनाचा (लिक्विड) उपयोग द्राक्षे, केळी, पपई या सारखी फळे पिकविण्यासाठी करण्यात येतो. यामुळे फळांना रंग येतो आणि लवकर पिकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
धडक मोहीम राबविणार
रसायनाने आंबे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करणार आहे. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या आणि आरोग्याला घातक असलेल्या रसायनाचा उपयोग करू नका, असे व्यापाऱ्यांना वारंवार सांगितले आहे. त्यानंतर व्यापारी घातक रसायनाचा उपयोग फळे पिकविण्यासाठी करीत असेल तर धडक मोहीम राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करू.
शशिकांत केकरे, उपायुक्त (अन्न),
अन्न व औषध प्रशासन विभाग.