राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का?, अंबादास दानवे यांची टीका
By कमलेश वानखेडे | Published: September 26, 2023 01:48 PM2023-09-26T13:48:32+5:302023-09-26T13:49:18+5:30
नागपुरातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी
नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी नागपुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, मोठया घराचा पोकळ वासा अशी म्हण आहे. मोठे नेते असताना विकास झाला नाही, मुंबईला तुंबई म्हणणारे, आता कुठे आहेत. मुंबई तर १ हजार मिलीमीटर पावसाला समोर गेली आहे. नागपुरात २०० ते ५०० मिमी पाऊस झाला तर काय होईल, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला नाही. नागपूरची पूरस्थितीत हे राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का, अशी टीकाही त्यांनी केली.
दानवे यांनी अंबाझरी, डागा ले-आऊट, वर्मा लेआऊट, पंचशील चौक, सीताबर्डी यासह नागनदीच्या पात्राचीही पाहणी केली. काही घरांमध्ये जावून तेथील नुकसानीची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, मुंबईतील नाले सफाईवर येथील नेते ओरडतात, पण नागपूरचे काय, येथे नालेसफाई झाली का, संरक्षण भिंत का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. डागा ले आउटमध्ये पार्किंगच्या नावाखाली, नाल्यावर आच्छादन टाकले आहे, नासुप्रने हा खर्च कुणासाठी केला होता. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता ५५ टीम सर्वेक्षण करीत आहेत. हे सर्वेक्षण वार्ड नुसार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही शिवसैनिकांने नेत्यांच्या कुटुंबियांवर टीका करू नये, कोणी शिवसैनिक करत असेल तर मी थांबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दानवे यांच्यासोबत माजी आ. दुष्यंत चतुर्वेदी, माजी खा. प्रकाश जाधव, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, दीपक कापसे, सतीश हरडे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष सुनावणी घेण्यापूर्वी कुणाला भेटले ?
- अध्यक्ष हे न्यायाधीकरण आहे ते प्राधिकरण नाही. अपात्रे संदर्भात जो कायदा आहे त्याचा अर्थ लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. जो अर्थ लावायचा असेल तो अर्थ त्यांनी लावावा. आमची जबरदस्ती नाही. पण अध्यक्ष हे सुनावाणी घेण्यापूर्वी कोणाला भेटले, त्यांच्याव कुणाचा दबाव आहे का, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलीच पाहिजे, असेही दानवे म्हणाले. लवकरात लवकर निर्णय घ्या, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आणि निर्देश असताना अद्याप निकालाच्या सुनावणीला सुरुवात झाली नाही. प्रोसेस कशी करायची यातच विधानसभा अध्यक्ष गुंतलेले असल्यामुळे यातच सगळे राजकारण गुंतलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला.