नागपुरातील अंबाझरी तलावाकडे पाहुण्या पक्ष्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:51 PM2017-11-13T13:51:17+5:302017-11-13T13:55:44+5:30

उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत.

Ambazari lake in Nagpur, neglected by guest birds | नागपुरातील अंबाझरी तलावाकडे पाहुण्या पक्ष्यांनी फिरवली पाठ

नागपुरातील अंबाझरी तलावाकडे पाहुण्या पक्ष्यांनी फिरवली पाठ

Next
ठळक मुद्देस्थानिक पक्ष्यांची संख्याही झाली कमीमासेमारी, प्रदूषित पाणी, असामाजिक तत्त्वांचा वाढता वावरदूषित पाणी थांबायला हवे२६५ पक्ष्यांच्या जाती दिसून येतात

सुमेध वाघमारे

आॅनलाईन लोकमत

नागपूर : उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत. तलावावर मोठ्या प्रमाणात होत असलेली मासेमारी, तलावाचे दूषित होत असलेले पाणी, पाण्यातील आॅक्सिजनचे कमी झालेले प्रमाण, पक्ष्यांची शिकार व असामाजिक तत्त्वांचा वावर हे यामागे कारण असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.
शहराचे हृदय असलेला अंबाझरी तलाव अद्यापही नैसर्गिक साधनसंपत्तीने वेढला आहे. मात्र याकडे शासनाचे लक्ष नाही. पैसे कमाविण्या पुरताच या तलावाचा विचार होत आहे. लाखो रुपयाच्या कंत्राटीवर मासेमारीसाठी हा तलाव देण्यात आल्याने या तलावाशी जुळून असलेली नैसर्गिक संपत्तीसह स्थानिक पक्षी, स्थानांतरित पक्षी दिसेनासे झाले आहे. दुसरीकडे तलावाचे पाणी दूषित होत असताना तातडीने उपाययोजना नाहीत. हा तलाव पश्चिमात्य देशात असता तर या तलावाला स्वर्गाचे रूप प्राप्त झाले असते, असे मत पक्षी निरीक्षक व्यक्त करीत आहे.
अंबाझरी तलावर पूर्वी स्थलांतरित पक्षी पट्टकदम्ब (बारहेडेड गूज) रेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड हे अडीचशे - ते चारशेच्या संख्येत दिसायचे ते आता फार कमी दिसतात. रशियातील आमूर पर्वताचा रहिवासी असलेला ‘आमूर फाल्कन’ हा ससाण्याच्या प्रकारातील पक्षी, युरोपवरून येणारा ‘लेसर सॅण्ड प्लॅवर’, ‘कलहंस’ (ग्रेलॅग गुज), दुर्मिळ तुर्रेवाला, काळे करकोचे, ब्लॅक हेडड आयबीस, युरोपचा गरुड आॅस्प्रे, स्पॉट व्हिल, इझंट टेल्ड जकाना, टपस्टेड डक, गार्जीनी, नॉदर्न सॉलर, कॉमन टिल, युरेशीयन व्हीसन, मल्हार्ड आदी पक्ष्यांचे थवेही दिसून येत नाही. अचानक या पक्ष्यांची कमी झालेली संख्या विचार करायला लावणारी आहे. सध्या या तलावावर मासेमारीसाठी कोलकातावरून १५च्यावर लोक आले आहेत. त्यांनी तलावाशेजारी झोपड्या बांधल्या आहेत.
त्यांच्या सोबत सात-आठ होड्याही आहेत. त्यांचा संपूर्ण पसरा काठावर पसरला असून याचा परिणाम, पक्ष्यांवर होत आहे.

मासेमारीचा परिणाम पक्ष्यांवर
पक्षी निरीक्षक डॉ. अनिल पिंपळापुरे म्हणाले, अंबाझरी तलावावर मोठ्या संख्येत मासेमारी होते. तलावाच्या बहुतांश भागात मासेमाºयांचे जाळे पसरुन राहते. स्थालांतरीत पक्षी येणे आणि यांच्या मासेमारीचा हंगाम सुरू होणे हे एकाचवेळी होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मासेमारीचे कंत्राट दिल्याने मोजक्याच जातीच्या मोठे मासे तयार होतात. यामुळे पक्षांचे खाद्य असलेले छोटे मासे कमी होतात. या सर्वांचा प्रभाव स्थलांतरीत पक्ष्यांवर होतो. दूषित पाणी हेही एक कारण आहे. यावर उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.

२६५ पक्ष्यांच्या जाती दिसून येतात
मानद वन्यजीव रक्षक व पक्षी निरीक्षक कुंदन हाते म्हणाले, अंबाझरी तलावात नाल्याचे पाणी मिसळत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झालेले आहे. परिणामी, स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, हे वास्तव आहे. परंतु स्थानिक पक्ष्यांची संख्या अद्यापही कायम आहे. नागपुरात साधारण ३२५ विविध पक्ष्यांच्या जाती आढळून येतात त्यातील २६५ पक्ष्यांच्या जाती एकट्या अंबाझरी तलावाच्या परिसरात दिसून येतात. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे तलावाचे संवर्धन होणे आवश्यक आहे.


दूषित पाणी थांबायला हवे
डॉ. बहार बाविस्कर म्हणाले, अंबाझरी तलावात दूषित पाणी मिसळत असल्याने पाण्यातील आॅक्सिजनची पातळी खूपच घसरली आहे. याचा परिणाम माशांवर होत आहे. पाणवनस्पतीही कमी झालेल्या आहेत. एकूणच या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर पडला आहे.

Web Title: Ambazari lake in Nagpur, neglected by guest birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.