यंदा पावसाळ्यात अंबाझरी तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:47 PM2019-09-18T23:47:56+5:302019-09-18T23:48:51+5:30
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्ष बुधवारी सकाळी संपली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील नागरिकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उशिरा सक्रिय झालेल्या मान्सूनने शहरात होणाऱ्या एकूण पावसाची सरासरी आताच ओलांडली आहे. तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशयेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. तरीही अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्ष बुधवारी सकाळी संपली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील नागरिकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला. विशेषत: तरुण आणि मुलांनी ओव्हरफ्लो पॉइंटवर पोहोचून तलावाबाहेर वाहणाऱ्या पाण्यात मोठ्या संख्येने मस्ती केली. पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केवली. सोशल मीडियावर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.
मान्सून सक्रिय झाल्याापासून तब्बल तीन महिन्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. दुसरीकडे गोरेवाडा तलावसुद्धा जवळपास भरला आहे. या तलावांमधून पाणीपुरवठा होत नाही. तरीही पर्यटन स्थळ म्हणून हा तलाव शहरातील नागरिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. जवळपास तासभर तो सुरु होता. त्यानंतर थोडा ब्रेक घेतल्यावर पुन्हा रात्री २.४५ वाजता पाऊस सुरु झाला. यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४८.७ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण १०५९.७ मि.मी. इतका पाऊस पडलेला आहे. हवामान विभागानुसार नागपूरसह विदर्भातील काही भागामध्ये मागील २४ तासात चांगला पाऊस झाला. चंद्रपूर येथे ४० मि.मी., यवतमाळ १२.८ मि.मी., वर्धा ९ मि.मी., अकोला ६.९ मि.मी., अमरावती ६ मि.मी आणि ब्रह्मपुरी येथे २ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दुपारी कडक उन्हाने वाढला उकाडा
मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेला पाऊस बुधवारी पहाटे थांबला. आकाशात ढग दाटून होते. परंतु दुपारी कडक उन पडल्याने उकाडा जाणवू लागला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आकाशात ढग दाटून राहतील. अधूनमधून पाऊस येत-जात राहील.