गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत

By Admin | Published: March 20, 2016 03:14 AM2016-03-20T03:14:52+5:302016-03-20T03:14:52+5:30

महापुरुषांची पळवापळवी हा ‘स्ट्रॅटजी’चा एक भाग झाला आहे. बाबासाहेबांचा जयजयकार करायचा, ...

Ambedkar can not be digested without leaving Golvalkar | गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत

गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत

googlenewsNext

श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : आंबेडकर अध्यासन व्याख्यानमाला
नागपूर : महापुरुषांची पळवापळवी हा ‘स्ट्रॅटजी’चा एक भाग झाला आहे. बाबासाहेबांचा जयजयकार करायचा, फोटोला हार घालायचे परंतु त्यांचे विचार स्वीकारायचे नाहीत. हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. राजकारणातच नव्हे तर समाजकारण आणि धर्मकारणातही ते सुरू आहे. बाबासाहेबांवर सर्वांचाच अधिकार आहे. परंतु त्यांना स्वीकारणे एक स्ट्रॅटजी म्हणून वापरले जाते. गोळवलकर गुरुजी यांच्यासोबत बाबासाहेबांचा फोटो लावला जातो. याला विरोध असण्याचे कारण नाही. गोळवलकर यांचे राष्ट्र सुधारणेचे कार्य मान्य आहे, मात्र गोळवलकर यांना मान्य असलेली जातीव्यवस्था आणि तीच जातीव्यवस्था नाकारणारे बाबासाहेब यांच्या फोटोची बेरीज करू पाहणाऱ्यांनी मात्र गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारअंतर्गत डॉ. आंबेडकर अध्यासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवारी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आायोजित करण्यात आले होते. ‘२१ व्या शतकात डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अध्यक्षस्थानी होते. तर कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सध्या जगभरात आणि देशात धार्मिक उन्माद माजला आहे. जगात इस्लामच्या नावाखाली दहशत माजविली जात आहे. इस्लामचा अर्थच शांतता असा आहे. पैगंबराचा इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा आहे. धर्माच्या या उन्मादामुळे जगाच्या व देशाच्या शांततेला तडे जात आहेत. जागतिकीकरणाचा सर्वाधिक फटका या देशातील गरीब, दलित आदिवासींना बसत आहे. अशा परिस्थितीत जगाच्या व देशाच्या सुरक्षिततेसाठी, शांततेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता आहे. त्यांच्या धम्माची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
बाबासाहेब हे केवळ एकट्या दलितांचे नव्हते तर ते महिलांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे कैवारी होते. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्रिपदाला ठोकर मारणारे होते. बाबासाहेबांनी ब्राह्मणांचा नव्हे तर ब्राह्मण्याचा विरोध केला आहे. ब्राह्मण्य हे प्रत्येक जाती धर्मात असते. जात ही जाणीव जिथे असेल तिथे ब्राह्मण्य असते. बाबासाहेबांच्या चळवळीत अनेक ब्राह्मण समाजाच्या व्यक्ती होत्या.
मनुस्मृतीचे दहन करण्याचा ठराव मांडणारी पहिली व्यक्ती ही ब्राह्मण समाजातीलच होती. अनेक समाजवादी आणि कम्युनिस्ट ब्राह्मणांनी कर्मठ सनातनी ब्राह्मणांना विरोध केला आहे. त्यामुळे ब्राह्मणही बदलू शकतात. ते बाबासाहेब स्वीकारत असतील तर त्यांच्यावर संशय घेण्याची गरज नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांचा विचार व्हावा. आजच्या संदर्भात आंबेडकरांच्या विचारांची दिशा कोणती याचा विचार व्हावा, असेही ते म्हणाले. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर, ई. मो. नारनवरे, जगन वंजारी, धनराज डहाट, भी.म. कौसल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

महात्मा गांधी व आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये संवाद व्हावा
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वाद होते. म्हणून त्यांच्या अनुयायांनी सुद्धा भांडत राहावे, असे होऊ नये. त्यांच्यात संवाद व्हावा. बाबासाहेबांचे विचार व्यापक दृष्टीने समजून घ्यावेत. संतांची व समाजसुधारकांची परंपरा एका सूत्रात बांधणे आवश्यक आहे, असेही डॉ. सबनीस म्हणाले.
‘डॉ. आंबेडकर व भारतीय संविधान’ यावर आज व्याख्यान
दीक्षांत सभागृहात रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावर संविधानाचे गाढे अभ्यासक डॉ. अनंत रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: Ambedkar can not be digested without leaving Golvalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.