आंबेडकरी समाजाने काँग्रेस-भाजपमागे फरफटत जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:51 PM2019-04-06T23:51:44+5:302019-04-06T23:53:35+5:30

काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला.

The Ambedkar community should not be interspersed with the Congress-BJP | आंबेडकरी समाजाने काँग्रेस-भाजपमागे फरफटत जाऊ नये

लॉर्ड बुद्धा टीव्हीतर्फे संविधान चौक येथे आयोजित चर्चासत्रात सहभागी उजवीकडून धर्मपाल मेश्राम (भाजप), डॉ. पूरणचंद्र मेश्राम (विचारवंत), संजय मेश्राम (काँग्रेस), उत्तम शेवडे (बसपा) आणि रवि शेंडे (वंचित बहुजन आघाडी)

googlenewsNext
ठळक मुद्देलॉर्ड बुद्धा टीव्हीच्या चर्चासत्रातील सूर : स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला.
लॉर्ड बुद्धा टीव्हीतर्फे शनिवारी संविधान चौकात चर्चासत्र आयोजित केले होते. ‘लोकसभा निवडणूक २०१९ आणि आंबेडकरी समाज’ हा या चर्चासत्राचा विषय होता. यासाठी विविध पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण करण्यत आले होते. यात काँग्रेसकडून संजय मेश्राम, भाजपकडून धर्मपाल मेश्राम, बसपाकडून उत्तम शेवडे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे रवी शेंडे उपस्थित होते. यासोबतच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हेही व्यासपीठावर होते.
लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर यांनी भूमिका विशद केली. ते म्हणाले, नागपूर हा बौद्ध आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु या बालेकिल्ल्याची ताकद अलीकडे निवडणुकीत दिसत नाही. तेव्हा या लोकसभा निवडणुकामध्ये आंबेडकरी समाजाची नेमकी भूमिका काय असावी, यासंदर्भात ही चर्चा घडवून आणली जात असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापल्या पक्षाची भूूमिका विशद केली. अनेक विषयांवर नागरिकांनी आपली तीव्र प्रतिक्रियाही दिली. उदाहरणार्थ खैरलांजी विषयावर नागरिकांनी काँग्रेसला धारेवर धरले. खैरलांजी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी का दिली, असा प्रश्न विचारण्यात आला तर आरक्षण व संविधानाच्या विषयावर लोकांनी भाजपला घेरले.
एक खासदार व एक आमदार मिळविण्यासाठी इतर पक्षांशी युती होऊ नये.
आरक्षण, रोस्टर, पाली भाषेचा विषय, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्ती आदींसह समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन इतर पक्षांसोबत आघाडी व्हावी, असा सूरही या चर्चासत्रात निघाला.
लॉर्ड टीव्हीचे संचालक सचिन मून यांच्यासह राजू मून, महेश नागपुरे, दत्ताजी गजभिये, अजय डोंगरे, दिनेश सोमकुंवर, कुणाल कांबळे, सिद्धार्थ सोनारे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रोखण्याचे काम काँग्रेसने सुरुवातीपासूनच केले आहे. बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे आणि समाजाला शासक बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावर चिंतन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
उत्तम शेवडे
बसपा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. परंतु त्या संविधानातील अधिकार समाजाला सहजासहजी मिळाले नाही. इतकी वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने ते मिळू दिले नाही. प्रत्येक अधिकारासाठी आंदोलन करावे लागले. रस्त्यावर यावे लागले. त्यामुळे आता आपल्यालाच आपली लढाई लढावी लागेल.
रवी शेंडे
वंचित बहुजन आघाडी

काँग्रेसवर आरोप केले जातात. परंतु काँग्रेस जर खरंच बहुजन समाजाच्या विरोधात असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याचा अधिकार दिला असता का? आजच्या परिस्थितीचे आकलन करा. आज काय सुरू आहे, त्याचा विचार करा.
संजय मेश्राम
काँग्रेस

केवळ निवडणुकीचा विचार न करता सामाजिक विषयावरही चिंतन होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समता, स्वातंत्र्य व बंधूता ही त्रिसूत्री संविधानात सांगितली आहे. तेव्हा सर्व विचारधारेमध्ये आपासात द्वंद्व न होता, सर्व विचारधारांच्या लोकांनी हातात हात घालून मानव कल्याणाचा विचार करता येऊ शकतो.
धर्मपाल मेश्राम
भाजप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्रिसूत्री दिली आहे. ती म्हणजे रिपब्लिकन पक्ष, संविधान आणि बौद्ध धर्म. या तिघांचीही स्थिती आज काय आहे, यावर चिंतन करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळीतील काही नेते किंवा कार्यकर्ते विविध पक्षात असले तरी, त्यांचे साामजिक कार्य कमी लेखता येणार नाही. चळवळीच्या एकजुटीसाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे.
डॉ. पूरणचंद्र मेश्राम
आंबेडकरी विचारवंत

Web Title: The Ambedkar community should not be interspersed with the Congress-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.