कुमुद पावडे यांना आंबेडकर जीवन गौरव
By Admin | Published: April 30, 2017 01:42 AM2017-04-30T01:42:24+5:302017-04-30T01:42:24+5:30
येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांना आंबेडकरराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिट्रेचरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
ई.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकालाही पुरस्कार
नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांना आंबेडकरराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिट्रेचरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकाला दया पवार आत्मकथन पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ नाटककार आणि संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी शनिवारी पत्रपरिषदेत २०१६ च्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांचे स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रीमुक्ती चळवळीत मोलाचे योगदान आहे. ‘अंत:स्फोट’ हे त्यांचे गाजलेले आत्मकथन आहे. विपुल वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत आयुष्य वेचले आहे. त्यामुळे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच मुंबईतील बी. रंगाराव यांच्या ‘उत्तर आधुनिकता: समकालीन साहित्य, समाज व संस्कृती या पुस्तकाला वसंत मून वैचारिक संशोधन पुरस्कार, इ.झेड. खोब्रागडे यांच्या ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकाला दया पवार आत्मकथन पुरस्कार, नांदेड येथील प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या ‘काळीजकुपी’ या कवितासंग्रहाला नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, अमावतीचे सुदाम सोनुले यांच्या ‘डंख’ या कथासंग्रहासाठी बाबुराव बागूल कथा पुरस्कार, डॉ. ईश्वर नंदपुरे यांच्या ‘चेहरे आणि मुखवटे’ या नाट्यकृतीला अश्वघोष नाट्यपुरस्कार आणि दिल्लीे डॉ. पूरण सिंह यांच्या ‘वचन और सौ हिंदी लघु कहानिया या पुस्तकाला भगवानदास हिंदी साहित्य पुरस्कार सुद्धा यावेळी जाहीर करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी रोख १० हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, व स्मृतिचिन्ह तर राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कारासाठी ५ हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ६ मे रोजी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित समारंभात हे पुरस्कार वितरित केले जातील. शुद्र या गाजलेल्या कादंबरीचे लेखक सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे प्रमुख अतिथी राहतील. पत्रपरिषदेत भूपेश थूलकर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड, राजन वाघमारे, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवते, पल्लवी जीवनतरे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)