आंबेडकर-ओवेसींचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:30 AM2018-09-04T01:30:11+5:302018-09-04T01:32:16+5:30
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पार्क येथे ही जाहीर सभा होणार आहे. तारीख अजून निश्चित झाली नसली तरी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पार्क येथे ही जाहीर सभा होणार आहे. तारीख अजून निश्चित झाली नसली तरी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना व छोट्या पक्षांना सोबत घेऊन भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये अनेक सामाजिक संघटना व लहान पक्ष सहभागी आहेत. एआयएमआयएमचे नेते खा. ओवेसी यांनी अलीकडेच बहुजन वंचित आघाडीला समर्थन दिले आहे. त्यामुळे भारिप आणि एमआयएमसारखे दोन महत्त्वाचे पक्ष मिळाल्यास आघाडी आणखी भक्कम होईल.
एआयएमआयएमने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांचे सध्या दोन आमदार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान तीन जागा लढवण्याची त्यांची तयारी आहे. भारिप बहुजन महासंघाचीही राज्यात ताकद आहे. अकोला पक्षाचा बालेकिल्ला असला तरी कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया येथे पक्षाचा कुठलाही प्रभाव नसताना लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भारिपच्या नवख्या उमेदवाराने तब्बल ४० हजारावर मते घेतली. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी बहुजन वंचित आघाडीने केली आहे. नागपुरात कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेत प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांच्यासोबतच अनेक संघटनांचे व पक्षाचे नेतेही राहणार आहेत. ही सभा म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
नागपूरवर फोकस
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता नागपूरवर फोकस करीत पक्षाच्या संघटन बांधणीवर जोर दिला आहे. याअंतर्गत बसपाचे सागर डबरासे यांना पक्षात आणण्यात आले असून त्यांच्यावर महासचिव पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय त्यांना नागपूरचे पक्ष संघटन मजबूत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यांच्या निर्देशानुसारच भारिप नागपूरची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी गठित होणार आहे. अनेक कार्यकर्ते व नेते भारिपमध्ये प्रवेश घेत आहेत.