संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरांनी सोबत यावे : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:07 PM2019-07-04T20:07:45+5:302019-07-04T20:12:58+5:30
वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीने कॉग्रेसला ४० जागा देण्याची भाषा केली आहे. यावर वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला साडेसहा टक्के तर काँग्रेसला जवळपास १६ टक्के मते मिळाली. तेव्हा काँग्रेसला ४० जागा सोडता असे म्हणणे म्हणजे आघाडीबाबत ते गंभीर दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांचे निश्चित झाले असे वाटते. त्यांची ही भूमिका भाजपला फायदा पोहोचविणार आहे. आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी त्यांच्याशी बोलणी करू. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. भाजप द्वेष आणि भीतीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली. पण जबाबदारी ही सर्वांचीच आहे. आम्ही कमी पडलो. काँग्रेसलाच नव्हे तर एकूणच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी, देशात विरोधी पक्षाची जागा कायम राहण्यासाठी राहुल गांधी हे आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार एस.क्यू. जमा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री उपस्थित होते.
साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन नाही
हे सरकार केवळ बोलघेवडे आहे. गेल्या पाच वर्षात कुठलेही काम सरकारने केलेले नाही. इतर अधिवेशनाप्रमाणेच शेवटचेही अधिवेशन पार पडले. केवळ फसव्या घोषणा झाल्या. अधिवेशनात मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढले, परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चिट देण्याचा सपाटा लावला. साडेचार वर्षात पदभरती केली नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. गेल्या साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन झालेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तिवर धरण प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करा
तिवर धरणाला तडे गेल्याची माहिती वर्षभरापूर्वीच स्थानिक नागरिकांनी दिली होती. मात्र त्यावर काहीच केले नाही. सत्ताधारी आमदाराकडे याचे कंत्राट होते. सरकारच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे बळी गेले. सरकार जबाबदार आहे. तिवर धरण प्रकरणी दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. तरीही येथील एक पूल वाहून गेला. धरणाचेही स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्यात आली. मंत्र्यावर ती केली असता तर बरे वाटले असते, असा चिमटाही त्यांनी काढला.