आंबेडकरांनी वंचित आघाडी रिपाइंमध्ये विलीन करून एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 07:18 PM2022-10-04T19:18:41+5:302022-10-04T19:19:13+5:30
Nagpur News ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करावे. वाटल्यास त्यांनी रिपाइंचे अध्यक्षपद घ्यावे, अशी ऑफर रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी दिली.
नागपूर : ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्यासह सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे. आपण सर्व एकत्र आलो तर खूप मोठी ताकद उभी राहू शकते. ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करावे. वाटल्यास त्यांनी रिपाइंचे अध्यक्षपद घ्यावे, अशी ऑफर रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी दिली.
मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, रिपाइंच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्थापनेच्या वर्षभरानंतर रिपाइंमध्ये फूट पडली व गटातटात विभागली गेली. जेव्हा जेव्हा रिपाइंचे गट एकत्र आले त्याचा फायदा झाला आहे. या एकीकरणाच्या प्रक्रियेला आपल्या गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस- राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून उद्धव ठाकरे यांनी भाजप-रिपाइंशी गद्दारी केली. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना चोख उत्तर देतील. दोन तृतीयांश आमदारांचे बहुमत असल्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेंचीच आहे, असे सांगत शिंदे यांचाच मेळावा मोठा होईल, असा दावा त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो रिपाइंचे सर्व गट वापरतात. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्याचा अधिकार शिंदे यांनाही आहे, असाही युक्तिवाद आठवले यांनी केला. रिपाइंला मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद व विधान परिषदेची एक जागा देण्याची मागणी त्यांनी केली. देशविरोधी कारवायांमुळे पीएफआयवर बंदी घातली गेली तर आरएसएस ही देशासाठी काम करणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भूपेश थूलकर, बाळासाहेब घरडे, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.
दलित पॅँथरची पुन्हा निर्मिती
- दलित पँथर पुन्हा सुरू करण्याची सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी विविध लोकांशी चर्चा करून विचारविमर्श केला जात आहे. ९ जुलैपर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
हत्ती चिन्हावर अधिकार कायम
- हत्ती हे मूळचे रिपाइंचे चिन्ह आहे. नंतरच्या काळात बसपाला ते चिन्ह मिळाले. मात्र, हत्ती चिन्हावर आजही रिपाइंचा अधिकार आहे, असा दावा आठवले यांनी केला.
मुंबईत राज ठाकरेंची गरज नाही
- मनसेचे नेते राज ठाकरे यांची भूमिका वेळोवेळी बदलत राहिली आहे. वाद लावणाऱ्या भूमिका ते घेतात. त्यामुळे त्यांना युतीत घेऊ नये, मुंबईत राज ठाकरे यांची अशी गरज नाही, आपली भूमिका असल्याचे आठवले म्हणाले.